नाशिक,दि.७ ऑक्टोबर २०२३ – वाद्यांचा झंकार, सुमधूर सुरांचा बहार आणि टाळ्यांच्या कडकडाटासह कालिदास कलामंदिर गेले दोन दिवस संगीतमय झाले होते.निमित्त होते,स्वरतपस्वी पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर संगीत साधक परिवार प्रस्तुत स्वरतीर्थ २०२३ या कार्यक्रमाचे. सप्त स्वरांची अनुभूती घेत, तालावर डोलत दसककर संगीत परिवारातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी दसककर संगीत परिवाराचे गुरू स्वरतपस्वी पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर यांच्या स्मृतीस व सरस्वती चरणी आपली संगीतसेवा अर्पण केली.
दसककर संगीत परिवारातील गुरू पंडित माधव दसककर, पंडित सुभाष दसककर, सौ. अश्विनी दसककर- भार्गवे, सौ. कल्याणी दसककर – तत्ववादी, सौ. गौरी दसककर- अपस्तंब व कु. ईश्वरी दसककर यांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार जसे, सरगम, पारंपरिक बंदिशी, चतरंग, तराणे, रागमाला तर उपशास्त्रीय प्रकारात अभंग, भजन, पदे तसेच बालगीते, प्रेरणा गीते, देशभक्तीपर गीते, स्तोत्र गीते असे अनेक प्रकार व सुगम संगीताबरोबर हार्मोनियम व सिंथेसायजर शास्त्रीय वादना सह पाश्चात्य संगीत देखील सादर करून रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. साथ संगतीला पंडित माधव दसककर व पंडित सुभाष दसककर यांचे हार्मोनियम वादन, ईश्वरी दसककर, सूरश्री दसककर यांचे सिंथेसायजर वादन, तबला वादनाची साथ श्री. सुजित काळे, श्री. चैतन्य दसककर व श्री. संजय दसककर, श्री. सारंग तत्ववादी, श्री. ओमकार अपस्तंब यांची तर ऑक्टोपॅडवर श्री. अभिजीत शर्मा व श्री. शुभम जाधव आणि टाळ साथसंगत श्री. अमित भालेराव यांनी साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बालाजीवाले यांनी केले. या कार्यक्रमास दोन्ही दिवशी शहराभरातून संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले.
सहा तारखेला कार्यक्रमाची सुरुवात परिवारातील सर्वात लहान विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. ‘एक तरी मोदक खा ना गणुल्या रे’ म्हणत या लहानग्यांनी उपस्थितांची मने जिंकली. पंडित श्री. सुभाष दसककर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सिंथेसायजर वादनाने देशाच्या सीमा ओलांडून उपस्थितांना पाश्चात्य जगताची सफर करून आणली. तसेच, त्यांच्या गत, ताना, तिहाया, छंद, झाला या प्रकारात सादर झालेला शाम कल्याण रागाने सुरांचा परमोच्च बिंदू गाठला. हे हिंदू नृसिंहा, सह्याद्री स्तोत्र , देशभक्तीपर गीत रसिकांना खूप भावले. पहिल्या दिवशीच्या चरणाची सांगता लोकप्रिय अशा दसककर भगिनींच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित सर्व विद्यार्थी ॐरामकृष्ण हरीच्या गजरात सामील झाले आणि वातावरण भारावून टाकले.
सात तारखेच्या दुसर्या सत्रात शास्त्रीय गायनासह भजन, निसर्गगीत, प्रार्थना यासह कानडी भजनाने उपस्थितांचे कान तृप्त झाले. याच सत्रात ज्येष्ठ कथक गुरु सौ. रेखाताई नाडगौडा, ज्येष्ठ तबलावादक आणि गुरु पंडित जयंत नाईक, ज्येष्ठ तबलावादक व गुरु पंडित गिरीश पांडे तसेच होमिओपॅथी तज्ञ आणि संगीत प्रेमी डॉ. योगेश कुलकर्णी यांचा संगीत क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी सत्कार करण्यात आला. दुसर्या सत्राची सांगता रावण रचित शिवतांडव स्तोत्राने झाली. अतिशय अवघड पण स्वर व तालबद्ध गायन, साथीला असलेला वाद्यवृंद व हर हर महादेवाच्या गजराने सभागृह दणाणून सोडले.