शनिवार पासून नाशिकरांना पाहता येणार २६०० वर्षे जुन्या नाण्यांचा संग्रह
प्राचीनत्वाचा प्रत्यय देणारे 'श्रीरामछंद'प्रदर्शनाचे नाशिक मध्ये आयोजन
नाशिक,दि.१५ डिसेंबर २०२३ –श्री काळाराम मंदिर संस्थान आयोजित तसेच प्राचीन नाणे संग्रहक व अभ्यासक चेतन राजापूरकर यांच्या सहकार्याने रामाच्या प्राचीनत्वाचा प्रत्यय देणान्या सुमारे २६०० वर्षापूर्वीच्या रामाचा उल्लेख असलेल्या नाण्यांना याचि देही याचि डोळा’पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे, अयोध्येत जानेवारीत होणाऱ्या श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने काळाराम मंदिरात १६ आणि १७ डिसेंबरला ‘श्रीरामछंद ‘या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शनिवारी (दि .१६) सकाळी दहा वाजता प्राचीन श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ,महाराष्ट्र राज्य गॅझेटिअरचे संपादक व सचिव डॉ.दिलीप बलसेकर,गुरुजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर व आदी मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनाचे वैशिष्टय म्हणवे तब्बल अडीच हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन नाण्यांवर रामाचा उल्लेख असलेली नाणी नाशिककरांना पाहायला मिळणार आहेत,दि.१६ आणि १७ या दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत नागरिक या प्रदर्शनाचा मोफत आस्वाद घेऊ शकणार आहेत,
श्रीरामछंद प्रदर्शनातून श्रीरामाचे प्राचीनत्व पाहायला मिळते.हे प्रदर्शन सर्वांसाठी महत्वाचे आहे.नाणी,शिलालेख यात श्रीरामाला शोधण्याचा छंद अनोख्या पद्धतीने साकारला गेला त्यामुळे या प्रदर्शनाला श्रीरामछंद असे नाव दिले,हे प्रदर्शन नवीन पिढीता प्रेरणा देणारे आणि शालेय मुलांना संस्कार घडविणारे ठरेल,त्यामुळे सर्वांनी प्रदर्शन नक्की पाहावे,असे आवाहन प्राचीन नाणे संग्रहक व अभ्यासक चेतन राजापूरकर यांनी केले आहे.