Nashik:अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

डॉ.जब्बार पटेल,अशोक हांडे,सदानंद जोशी यांचा होणार गौरव

0

नाशिक,दि,२६ फेब्रुवारी २०२४ –अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नाशिकच्या वतीने दर दोन वर्षांनी देण्यात येणारे वि.वा.शिरवाडकर लेखन,प्रा वसंत कानेटकर रंगकर्मी व नटवर्य बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्वर्गीय तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जयंती तथा मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा नाट्यरिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम कार्यवाह सुनील ढगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार अशोक हांडे यांना जाहीर करण्यात आला असून वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार १०० व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल यांना तसेच बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांना देण्यात येणार आहे.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील कालिदास कलामंदिरात होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने वि.वा.शिरवाडकर आणि वसंत कानेटकर पुरस्कार १९९८ पासून दिले जात आहेत.यंदा पुरस्काराचे १५ वे वर्ष आहे.वि.वा.शिरवाडकर लेखन पुरस्कार व वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कारांमध्ये यंदापासून पाच हजारांची वाढ करण्यात आली आहे. ३१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. तर शहरातील ज्येष्ठ नाट्यकर्मींसाठी सुरू करण्यात आलेला बाबूराव सावंत पुरस्कार २०१४ पासून दिला जात आहे. या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यंदा हा पुरस्कार नाट्यकर्मी सदानंद जोशी यांना देण्यात आला आहे. १५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे यांच्यासह डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी,ईश्वर जगताप यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश होता.

पत्रकार परिषदेत नाट्य परिषद नाशिक शाखेचे उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, खजिनदार ईश्वर जगताप, सहकार्यवाह विजय शिंगणे, सुनील परमार आदी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!