पवार तबला अकादमीतर्फे शनिवारी तालाभिषेक बैठक

0

नाशिक,दि. २७ सप्टेंबर २०२३ – पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाशिककरांसाठी ‘तालाभिषेक बैठक ’ या छोटेखानी संगीत मैफिलीचे आयोजन दर दोन महिन्यांतून एकदा केले जाते. याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.

या उपक्रमातील पाचवी बैठक शनिवार , दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी सायं ६ वा विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे आयोजित केली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दीपक बिल्डर्स आणि डेव्हलपर्स चे दीपक चंदे व प्रख्यात डॉ. विनीत वानखेडे आहेत.

या मैफिलीत पुण्याचे प्रसिद्ध तबलावादक पांडुरंग पवार यांचे स्वतंत्र तबलावादन होईल. पांडुरंग पवार हे पं . रामदास भोयर यांचे शिष्य असून भारतभर स्वतंत्र तबलावादनाबरोबरच गायन व वाद्यसंगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांना त्यांनी साथसंगत केली आहे. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव ,वसंतोत्सव ,कलाश्री संगीत महोत्सव यासांरख्या अनेक नामांकित महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली आहे. त्यांना सागर कुलकर्णी (संवादिनी) साथ करतील.

यानंतर नाशिक येथील उदयोन्मुख युवा गायक अथर्व वैरागकर यांचे शास्त्रीय गायन होईल. अथर्व प्रसिद्ध गायक पं . शंकरराव वैरागकर यांचे नातू व शिष्य असून त्यांनी गेली १२ वर्षे पं . शंकरराव वैरागकर यांच्याकडून गायनाचे रीतसर शिक्षण घेतले आहे. शास्त्रीय गायनासोबतच उपशास्त्रीय गायनही ते सादर करतात. त्यांना ईश्वरी दसककर (संवादिनी ) आणि अथर्व वारे (तबला)साथ करतील.

कार्यक्रमाचे संयोजन अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार ,एस.डब्ल्यू.एस.फायनान्शीयल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!