अमृतवक्ता स्वानंद बेदरकर यांचे उद्यापासून नाशिकमध्ये व्याख्यान
सरस्वती व्याख्यानमालेेस उद्यापासुन प्रारंभ
नाशिक,दि,१६ फेब्रुवारी २०२४ – शहरातील रसिक-जिज्ञासू श्रोत्यांना चांगले काही ऐकावयास मिळावे, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली ‘सरस्वती व्याख्यानमाला’ यंदा उद्या शनिवार दि. १७ आणि रविवार दि. १८ अशी दोन दिवस होत असून ख्यातनाम वक्ते आणि साहित्यिक स्वानंद बेदरकर हे यावेळी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
श्रीपाद गलगले आणि गलगले कुटुंबीयांच्यावतीने होणाऱ्या या व्याख्यानमालेत श्री. बेदरकर हे यंदा ‘क्रांतदर्शी आद्य शंकराचार्य’ या विषयावर बोलणार आहेत. आद्य शंकराचार्यांचे कार्य हे समाज आणि राष्ट्र जीवनाच्या दृष्टीने कसे पथदर्शी होते या विचाराबरोबरच आपल्या अभूतपूर्व रचनांमधून त्यांनी अभ्यासकांनाही कसे प्रेरित केले यावरही बेदरकर प्रकाशझोत टाकणार आहेत.
यंदाचे व्याख्यानमालेचे तिसरे वर्ष असून गत दोन वर्ष रसिकांनी उदंड प्रतिसाद देऊन व्याख्यानमालेची रंगत वाढवली होती. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी डॉ. शंकराचार्य सभागृहात सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होईल, तरी कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन श्री.व सौ.गलगले कुटुंबीय आणि मित्र परिवाराने केले आहे.