Nashik : स्वराधिराज संगीत महोत्सवात मान्यवर गायकांची मांदियाळी

कलाश्री संगीत गुरुकुलाच्या वतीने आयोजन ;डॉ.आशिष रानडे,पं.श्रीनिवास जोशी,विराज जोशी,पं आनंद भाटे यांचा समावेश

0

नाशिक,दि,८ फेब्रुवारी २०२४ –आपल्या अवीट,भारदस्त गायकीने अवघ्या विश्वाला वेड लावणाऱ्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी नाशिकच्या कलाश्री गुरुकुल च्या वतीने शनिवार ( दिं १०) व रविवार ( दि ११ फेब्रु ) रोजी संध्याकाळी ६ वाजता, गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या, कुर्तकोटी सभागृहात स्वराधिराज (Swaradiraj Music Festival)या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेआहे.

भारतीय संगीत क्षेत्रात पं. भीमसेन जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरते. शास्त्रीय संगीत भक्तीरसातून जनसामान्यापर्यंत रुजवण्यात आणि भक्तीसंगीत रसिकांच्या ओठांवर रूळवण्यात या दिग्गज गायकाचा फार मोठा वाटा आहे. या ऋषीतुल्य व्यक्तीच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची संपूर्ण गानयात्रा सादर होणार आहे. शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात पं आनंद भाटे यांचे शिष्य ज्येष्ठ गायक डॉ. आशिष रानडे व पंडीत भीमसेन जोशी यांचेसुपूत्र श्रीनिवास जोशी हे गायन सादर करणार आहेत. डॉ आशिष रानडे हे डॉ.अविराज तायडे आणि पं आनंद भाटे यांचे शिष्य असून गेली २० वर्षे ते या दोघांकडून तालीम घेत आहे. संगीत विषयात डॉकटरेट तसेच आकाशवाणी चे ए ग्रेडचे शास्त्रीय गायक म्हणून ते ओळखले जातात. २०२० चा आयसीएम ए आर्टिस्ट ऑफ द इयर हा सन्मान प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. पं गजानन बुवा जोशी स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत तसेच भारतातील अनेक मान्यवर महोत्सवात तसेच परदेशातही त्यांचे सादरीकरण झाले आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच अभंग देखील सादर करणार आहेत.

पं.भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी देशविदेशातील संगीत महोत्सवात आपली कला पेश केली असून नाशिककरांना त्यांची गायकी ऐकण्याची संधी या निमित्ताने लाभणार आहे.
दुसऱ्या दिवशी रविवार ( दि ११ फेब्रु ) रोजी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी हे आपली कला सादर करणार आहेत. विराज जोशी यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कर्नाटक सरकारतर्फे दिला जाणारा युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळविणारा विराज सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला आहे. यावेळी तेही गायनातील विविध प्रकार सादर करणार आहेत.

महोत्सवात  भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं आनंद भाटे हे गायन सादर करणार आहेत. आनंद यांचा जन्म इ.स. १९७१ मध्ये पुण्याच्या भाटे कुटुंबात झाला. त्यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे पणजोबा भाटेबुवा हे ठुमरी गायनातील व नाट्यसंगीतातील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, तिच्याद्वारे त्यांनी अनेक संगीत नाटके बसविली होती. आनंद यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालगंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीवचंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे त्यांना संगीत शिक्षण घेण्यास पाठवले. यशवंत मराठे यांच्याकडेही त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे गिरवले. आनंद यांनी इ.स. १९८१ म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम केला. पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे आनंद भाटे हे १५ वर्षे संगीत शिकले. एक लहान मुलगा बालगंधर्वाची नाट्यगीते हुबेहूब गातो हे पाहून लोक आनंद भाटे यांना आनंद गंधर्व म्हणू लागले. त्यांचे गायन नाशिककरांसाठी मेजवानी ठरणार आहे.

कलाश्री संगीत गुरुकुलातर्फे फेब्रुवारी महिन्यात पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वराधिराज’ संगीत महोत्सव सुरू व्हावा असा विचार मनात आला आणि या महोत्सवाची २०१७ मध्ये सुरुवात झाली. पहिल्या वर्षी भीमसेन जोशी यांचे शिष्य डॉक्टर अविराज तायडे यांची मुलाखत आणि शास्त्रीय गायन असा करण्यात आला ज्याला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. पुढील वर्षी जेष्ठ गायिका मंजूषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती त्यालाही नाशिकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला

त्यानंतर २०१९ साली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त अभंग भक्तीगीत गायनाची स्पर्धा घेण्यात आली ज्याला जवळपास तिनशे स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली २०२०, २०२१ ही दोन्ही वर्ष कोविड मुळे आयोजन करणे शक्य नाही. भारतरत्न भीमसेन जोशी यांना नाशिककरांकडुन ही आदरांजली अर्पण करण्यासाठी रसिकानी जास्तीत जास्तसंख्येने उपस्थित राहण्याचा आवाहन कलाश्रीचे संचालक डॉ.आशिष रानडे यांनी केले आहे.

यंदापासून कलाश्री युवा कलासाधक पुरस्कार
कलाश्री गुरुकुलाच्या वतीने यंदाच्या वर्षापासून कलाश्री युवा साधक पुरस्कार दिला जाणार असून तो भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.