नाशिक,दि.४ जुलै २०२३ –नाशिकची ओळख सध्या बिबट्याची माहेरघर अशी होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी जयभवानी रोडवर जॉगर्स दाम्पत्याला बिबट्याने दर्शन दिले होते. यानंतर आठवडाभरापूर्वी याच भागातील गुलमोहर कॉलनीत बिबट्याने पादचाऱ्याला जखमी केले होते. पण बिबट्या दिसल्याच्या पोस्टमुळे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हैराण झाले आहेत. काहीजण खात्री न करता अशा पोस्ट फॉरवर्ड करता आहेत असे निदर्शनास आले आहे त्यामुळे कॉल किंवा व्हॉटसऍपवर पोस्ट येताच वनविभागाचे पथक सदर घटनास्थळी जाऊन सर्च ऑपरेशन करावे लागते मात्र हाती काहीही लागत नाही.
गेल्या दहा दिवसात रोज कुठे ना कुठे जाऊन अशाप्रकारे शोध मोहीम केली जाते आहे. एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता नागरिकांना अफवा पसरवू नका, असे आवाहन वनविभागाकडून केले जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिककरांनो कुठलीही खात्री न करता सोशल मीडियावर ‘बिबट्या आला रे आल्याची’ पोस्ट तुम्ही फॉरवर्ड करत अफवा पसरवणार असाल तर थांबा कारण आता अशा अफवा पसरवणाऱ्यांवर वनविभाग थेट गुन्हे दाखल करणार असून त्यासाठी सायबर पोलिसांची देखील मदत घेतली जाणार आहे.
बिबट्या फिरतोय, अशा अफवा, पसरवणाऱ्यांवर व अन्य ठिकाणांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियाद्वारे व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी दिले आहेत.काही दिवसांपूर्वी जयभवानी रोडवर जॉगर्स दाम्पत्याला बिबट्याने दर्शन दिले होते. यानंतर आठवडाभरापूर्वी याच भागातील गुलमोहर कॉलनीत बिबट्याने पादचाऱ्याला जखमी केले होते. यानंतर बिबट्या लष्करी हद्दीतील जंगलात स्थलांतरीत झाला
जयभवानी रोडच्या परिसरात मागील दहा दिवसांपासून बिबट्याच्या कोठेही पाऊलखुणा दिसलेल्या नाहीत. मात्र, चुकीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केले जात असल्याने वन विभागासह रहिवाशीही वैतागले होते. बुधवारी संध्याकाळी अशाप्रकारे भालेराव मळ्यातील एका झाडावर बसलेल्या बिबट्याचा चुकीचा फोटो व्हायरल करण्यात आला होता. मात्र अफवांचे पेव फुटल्याने वन विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे.