माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दिंडोरी मतदार संघात अचानक जोरदार चुरस निर्माण झाली आहे.भाजपाच्या विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने त्यांची उमेदवारी प्रारंभीच जाहीर केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी ही लढत सरळ झाल्यास रंगतदार होईल असे वाटत होते. मात्र महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळायला हवी,अशी मागणी या भागात चांगला दबदबा असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. जिवा पांडू गावित यांनी केली. तथापि शरद पवार भगरे यांच्या नावावर ठाम राहिले. मग गावित यांनी आघाडीला वाघाडीत विसर्जित करून बंडाचा झेंडा फडकावला.आघाडीत अशी बिघाडी झाल्याने भाजपाच्या गोटात काही दिवस आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मात्र आता हरिश्चंद्र चव्हाण यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने भाजपाच्या पोटात गोळा उठला असेल तर नवल नाही.
‘अब की बार चार सो पार’ चा नारा वास्तवात आणण्यासाठी किंवा अन्य काही उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रात्रंदिवस प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन फिरत आहेत. भारती पवार यांच्यासाठीही पिंपळगावमध्ये त्यांची सभा आयोजित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते आवश्यकही आहेत. कारण कांद्याच्या प्रश्नावर भाजपाविरोधात मोठा रोष स्पष्ट दिसत आहे. त्यावर मोदी यांनाच काही खुलासा करावा लागेल. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी, ‘निर्यातीच्या नियमांत काही बदल आवश्यक आहेत. त्या नव्या नियमांसह लवकरच अंमलबजावणी होईल,’असे थातुर मातुर उत्तर दिले खरे,पण त्याने बहुधा त्यांचे स्वतः:चेही समाधान झाले नसेल.मग शेतकऱ्यांचे तर सोडूनच द्या.भयानक उन्हाळा आणि पाणी टंचाई जाणवू लागल्यावर साहजिकच सरकारविरुद्ध रोष तयार होतो.त्यात कांद्याचा वांधा!केवळ कांदाच नव्हे तर टोमॅटो आणि भाजीपाला उत्पादकदेखील त्रस्त आहेत.
या दुष्काळात तेरावा महिना चव्हाण यांच्या बंडखोरीच्या रुपाने भाजपासमोर उभा ठाकला आहे. पूर्वीचा मालेगाव आणि आताच्या दिंडोरी मतदार संघातून तीन वेळा खासदार राहिलेले चव्हाण भाजपाचे निष्ठावंत आहेत. सन २००८ मध्ये भारत-अमेरिका अणुकरारावरून डाव्या पक्षांनी मनमोहनसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यावेळी चव्हाण एका अपघातात जखमी झाले होते व रुग्णालयात दाखल होते. मात्र युपीए सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यासाठी तेव्हाचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी खास एअर ऍम्ब्युलन्सने चव्हण यांना दिल्लीला नेले होते. चव्हाण यांनी जिल्ह्याच्या संपूर्ण आदिवासी भागात पक्ष रुजविण्यासाठी जीवाचे रान केले आहे. एवढेच नव्हे गेल्या निवडणुकीत भारती पवार याना उमेदवारी दिल्यानंतरही चव्हण यांनी पक्षाचे काम केले. मात्र गेल्या काही काळात पक्ष त्यांना डावलतो आहे, अशी भावना तयार होऊ लागली होती. त्याच्याच परिणामी कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे चव्हाण यांनी आता मैदानात शड्डू ठोकला आहे. तो भाजपाची डोकेदुखी वाढविणारा आहे.
या मतदार संघातील सहापैकी -छगन भुजबळ,दिलीप बनकर,नरहरी झिरवाळ आणि नितीन पवार असे चार आमदार अजित पवार गटाचे तर सुहास कांदे हे शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि राहुल आहेर भाजपाचे आहेत.सर्व आमदार महायुतीचे असल्यामुळे भाजपाला लढत सोपी आहे असा समज चुकीचा आहे.कारण पवार,चव्हाण, गावित यांच्यात कोकणा मतदारांचे विभाजन होईल आणि महादेव कोळी समाजाचे एकगठ्ठा मतदान भगरे यांचे पारडे जड करील,असे जाणकारांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर चव्हण यांनी भाजपाची डोकेदुखी वाढवली नाही तर काय आहे? मोदी यांची संभाव्य सभा,निमशहरी भागातील वातावरण आणि इतर समीकरणे या बाबत पुढील भागात.
-सुधीर कावळे
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
Mo-9423157510