नाशिक,दि. १३ ऑक्टोबर २०२३-जीवन संघर्षमय आहे आणि यशस्वी होण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. त्याबरोबर मेहनतही आवश्यक आहे. धरसोड वृत्तीमुळे ध्येय गाठण्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळेच आपल्या कोणत्याही ध्येयप्राप्तीसाठी प्रवास करताना प्रयत्नांमध्ये सातत्य हवे.त्यासाठी आपण स्वतःमध्ये छोटे-छोटे सकारात्मक बदल केल्यास त्याचा निश्चितच चांगला परिणाम होतो, असे प्रतिपादन नाशिक शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी सिन्नर महाविद्यालयात केले.
सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, जीवनामध्ये चढ-उतार येतातच, परंतु त्यामुळे जीवनाला गती प्राप्त होते. स्वतःबरोबर इतरांचे विश्लेषणही आपल्याला करता आले पाहिजे. आपल्यामध्ये आपल्यालाच माहीत नसलेल्या गोष्टींची जाणीव आपले गुरु किंवा शिक्षक आपल्याला करून देत असतात. त्यांचा विकास करता आला पाहिजे. आपले शिक्षक आणि आपले सद्गुरु आपल्याला माहीत नसलेल्या आपल्यामधील गोष्टींची ओळख आपल्याला करून देत असतात. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे गेल्यास यश निश्चितच मिळते, असे म्हणून या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक श्री. कृष्णाजी भगत हे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. स्वच्छता व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असल्याची जाणीवही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी करून दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी केले. यावेळेस त्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव करून स्वच्छता कार्यक्रम हा फक्त गांधी जयंती पर्यंतच मर्यादित न राहता आपण सतत आपल्या आजूबाजूला स्वच्छता करत राहिले पाहिजे असे आवाहन केले.
महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यार्थी विकास मंडळातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी महाविद्यालय परिसराबरोबरच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सिन्नर मधील सुप्रसिद्ध ऐश्वर्येश्वर मंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. ललित कळसकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट प्रा. संदीप भिसे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अंबादास कापडी, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. चांगदेव गुरुळे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. ए. ए. पोटे, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. एस. एन. कासव, प्रा. आर. टी. सोनवणे, डॉ. दत्तात्रय वेलजाळी, प्रा. संतोष जाधव, प्रा. श्रीमती स्वाती चतुर, प्रा. बी. यू. पवार, प्रा. विक्रम हारक, प्रा. एस. बी. झाडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय वेलजाळी यांनी केले, तर आभार प्रा. ललित कळसकर यांनी मानले.