नाशिक,दि. ४ ऑक्टोबर २०२३ – नाशिक शहरातील स्वरतपस्वी पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर संगीत साधक परिवारातर्फे स्वरतीर्थ २०२३ सप्तस्वरांची अनुभूती हा कार्यक्रम महाकवी कालिदास कला मंदिर येथे ६ व ७ ऑक्टोबर रोजी सादर होणार आहे.
दसककर संगीत परिवारातील गुरू पंडित माधव दसककर, पंडित सुभाष दसककर, सौ. अश्विनी दसककर- भार्गवे, सौ. कल्याणी दसककर – तत्ववादी, सौ. गौरी दसककर- अपस्तंब व कु. ईश्वरी दसककर, कु. सुरश्री दसककर यांच्यासह सुमारे दोनशे विद्यार्थी या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीताबरोबर हार्मोनियम व सिंथेसायजर वादन सादर करणार आहेत. यात शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार जसे, सरगम, बंदिश, तराणे, चतरंग, रागमाला तसेच बालगीते, निसर्ग गीते, भजन, अभंग, पदे, देशभक्तीपर गीते यांसारखे अनेक वैविध्यपूर्ण प्रकार सादर होणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच ते आठ आणि शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत शहरातील रसिक श्रोत्यांनी महाकवी कालिदास कलामंदिर येथे येऊन या स्वर मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन दसककर संगीत परिवारातर्फे करण्यात आले आहे.