पं.कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन घडवणार्या ‘सूर गंधर्व’कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन
सुलेखनकार अच्युत पालव सुलेखनाचा आविष्कार तर प्रीतम नाकील यांचे गायन
नाशिक,दि,१६ एप्रिल २०२४-ख्यातनाम गायक स्व.पंडित कुमार गंधर्व ( Pt. Kumar Gandharva)यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पं.कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन घडवणार्या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सूर गंधर्व’ या शीर्षकाने होणारा हा कार्यक्रम ऋचिता विश्वास ठाकूर आणि अबीर क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
पं.कुमार गंधर्व यांची निर्गुणी भजने गायक प्रितम नाकील सादर करणार असून त्यांना तबला साथ रसिक कुलकर्णी,संवादिनी ऋषिकेश कुलकर्णी करणार आहेत. जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव सुलेखनाचा आविष्कार पेश करणार आहेत. यात कुमारजींच्या गायकीचे प्रयोगशील निर्मितीचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना व संहितालेखन निलेश गायधनी यांचे असून संयोजक पुजा निलेश आहेत.
बुधवार १७ एप्रिल २०२४ (श्रीराम नवमी) रोजी सायंकाळी ५:३० वाजता डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब,ठाकूर रेसिडेन्सी,विश्वास बँकेसमोर,स्वातंत्र्यवीर सावरकरनगर,गंगापूर रोड,नाशिक येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप.बँक लि.नाशिक,विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर, अबीर क्रिएशन्स, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले असून हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.
तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर, ऋचिता विश्वास ठाकूर व अबीर क्रिएशन्सच्या पुजा निलेश यांनी केले आहे.