नाशिक,दि,१२ मार्च २०२५ – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने एक अनोखा आणि सुरेल कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित केला जात आहे. आठवणीतल्या कविता…!! हा संगीत व कवितांचा अनोखा मिलाफ असलेला कार्यक्रम शुक्रवार, १४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता विशाखा सभागृह, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गंगापूर रोड, नाशिक येथे रंगणार आहे. या खास सांस्कृतिक सोहळ्याचे संयोजन मिती ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकार कविता वाचन आणि त्यांच्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आणि अभिनेता स्वानंद बर्वे या कार्यक्रमात काही आठवणीतील कवितांचं वाचन करणार आहेत. तर काही कवितांची झालेली गाणी शार्दुल कवठेकर आणि दीपाली देसाई हे गायक सादर करणार आहेत. किशोरी किणीकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील. हे नामवंत कलाकार आपल्या सुरेल आवाजाने आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांना एका वेगळ्या अनुभूतीची यात्रा घडवणार आहेत. मराठी कवितांना मिळालेली संगीतमय रूपं आणि त्यामागची गोडी प्रेक्षकांना नव्याने अनुभवता येणार आहे. कविता हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याचा अविभाज्य भाग असून या ठेव्याचे सादरीकरण एका नव्या रूपात पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड.आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र शासनातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य परंपरेतील कवितांचे गाण्यांमधील रूपांतर रसिकांनी अनेक दशकांपासून अनुभवले आहे.केशवसुत,कुसुमाग्रज,बा. भ.बोरकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर, इंदिरा संत, शांता शेळके यांसारख्या महान कवींनी मराठी मनात घर केलेल्या कविता लिहिल्या, ज्या पुढे गाण्यांच्या रूपात अधिक लोकप्रिय झाल्या. अशा काही निवडक कवितांचे वाचन व त्या कवितांवर आधारित गीतांचे सादरीकरण यावेळी होणार आहे. त्यामुळे रसिकांना हा एक अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आणि नव्या पिढीला मराठी कवितांचा आनंद देणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमाला नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे, त्यामुळे कविता आणि संगीत यांची जादू अनुभवण्यासाठी ही संधी सोडू नका असं आवाहन आयोजकांनी केले आहे. !