नाशिक महानगर पालिकेच्या होर्डिंग निविदेत कोट्यावधींचा घोटाळा
नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांचा गौप्यस्फोट
नाशिक,दि,३० जानेवारी २०२४ –नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातून महापालिका हद्दीतील जागांसाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढण्यात आली. मात्र याच विभागातील कर्मचाऱ्यांशी आधीच ठरल्याप्रमाणे पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला टेंडर मिळवून देण्यात आले. मात्र यातील निविदा, कार्यादेश व करारनामा यात मोठ्या प्रमाणात तफावत करण्यात आली असुन यातून कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप खासगी जागेतील जाहिरात फलक धारकांची संघटना असलेल्या नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
जाहिरात फलकाची निविदा सूचना, कार्यादेश व करारनामा यात मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीने हव्या तशा अटी, शर्ती घुसविण्यात आल्या आहेत तर काहींमध्ये सोयीस्कररित्या बदल करण्यात आला. नाशिक शहरात कुठेही, कसेही, कोणत्याही ठिकाणी जाहिरात फलक लावण्याचे अधिकारी मक्तेदारास देण्यात आले. यात मनपा मालकीच्या वापरात असलेल्या, वापरात नसलेल्या खुल्या जागा, पदपथ, इमारती, उद्याने, वाहतूक बेटे, रस्त्यामधील दुभाजक यात मोठ मोठ्या होर्डिंग उभे करण्याची मुभा देण्यात आली. सदरची निविदा ही फक्त २८ होर्डिंगसाठी देण्यात आली होती. तसेच आदेश देखील २८ होर्डिंगचाच देण्यात आला. मात्र आज सुमारे ६३ हून अधिक होर्डिंग उभे आहेत. यापैकी फक्त २८ होर्डिंगचेच भाडे महानगरपालिकेला मिळत आहे आणि बाकीच्या होर्डिंगची कुठलीही नोंद अथवा भाडे महापालिकेमध्ये भरत नसल्याचे आढळून येत आहे.
नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने महापालिका आयुक्तांना व शहरातील मंत्री, पालक मंत्री, सर्व आमदार व खासदार यांना देखील निवेदन देण्यात आले असून त्यांनी देखील सादर निविदेच्या चौकशीचे आदेश आयुक्तांना दिले आहे. यावर आयुक्तांनी तातडीने समिती गठीत करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच यात घोटाळा आढळल्यास निविदा रद्द करण्याचे आश्वासन नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळास दिले आहे.
यावेळी विक्रम कदम, मच्छिंद्र देशमुख, नंदन दीक्षित, इम्तियाज अत्तार, गणेश बोडके, रवी शिरसाठ, अमित पाटील, विष्णुपंत पवार, अनुप वझरे, गौरव माटे, निखिल सुराणा, सौरभ जालोरी, बंटी धनविजय, मनीष नाशिककर, सुरेश सोळंके, दीपक पवार, हर्षद कुलथे, सोमनाथ पाटील, निलेश विसपुते, रमेश गीते, विराज पवार यांसह जाहिरात फलक एजन्सी धारक उपस्थित होते.
संख्या,प्रकार,जागांमध्ये बदल
निविदा, कार्यादेश, करार नाम्यानंतर निविदेत देण्यात आलेली २८ ही संख्या अमर्याद करण्यात आली. फक्त जाहिरात फलकांसाठी निविदा असताना मनपा मालकीच्या वापरात असलेल्या, वापरात नसलेल्या खुल्या जागा, पदपथ, इमारती, उद्याने, वाहतूक बेटे, रस्त्यामधील दुभाजक यात उभारण्यास परवानगी देण्यात आली. तसेच फक्त जाहिरात फलकांसाठी निविदा असताना आकाश चिन्ह, जाहिरात फलक, हो, युनिपोल, प्रकाशित व अप्रकाशित जाहिरात फलक, एलईडी वॉल यासर्वांची मुभा देण्यात आली व सर्वांचे दर देखील एकच ठेवण्यात आला.