आज तरी लढत तुल्यबळ !

अखेर नाशिक मतदार संघातील महायुतीचा तिढा सुटला ... आजच महायुतीचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली या विषयी ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे यांनी मांडलेला लेखाजोखा 

0

नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीतर्फे अखेर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खरे तर गोडसे यांनी केलेली कामे, त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्व, नातेवाईकांचा मोठा गोतावळा, सामान्यांना केव्हाही भेटू शकणे यामुळे त्यांना तिकीट मिळू नये असे काही नव्हते. विशेष म्हणजे हाच गुण समुच्चय त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे गटाचे श्री. राजाभाऊ वाजे यांच्याकडेही आहे. त्यामुळे ही टक्कर तुल्यबळ होणार हे आजचे तरी चित्र आहे. वाजे यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे हे पाहता गोडसे यांची उमेदवारी घोषित करण्यास विलंब झाला आहे हे निश्चित. त्यात एकट्या भाजपाला दोष द्यायचा की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही, हा चर्चेचा विषय असू शकतो. मात्र जे घडले त्याची कारणमीमांसा करत न बसता उरलेल्या १५ दिवसांत सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये जे तहात कमावले आहे ते मविआशी लढाईत गमावण्याची वेळ येणार नाही.

गोडसे यांनाच उमेदवारी द्यायची होती तर एवढा घोळ का घालण्यात आला, असा प्रश्न केवळ राजकीय कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्य जनतेलाही पडलेला आहे. आधी जागा कोणाला याची चर्चा होत राहिली. मात्र विद्यमान खासदार असताना त्याच पक्षाला आणि त्याच व्यक्तीला तिकीट मिळणार यात काही रॉकेट सायन्स नव्हते. तरीही सर्व्हे नावाचे पिल्लू सोडून देण्यात आले. या सर्व्हेने म्हणे, गोडसे यांना उमेदवारी देऊ नये असा निष्कर्ष काढला होता. त्यात दिल्लीतून म्हणजे मोदी-शाह यांनी आपले नाव सुचवले असे छगन भुजबळ यांनी सांगितल्यानंतर नवा पेच तयार झाला. तशात भाजपालादेखील ही जागा हवी आहे असा त्या पक्षाचा दावा होता. या सगळ्या घडामोडींत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या काही जागांवर ठाम राहिले.

यवतमाळ, हिंगोली आदी एक दोन ठिकाणी त्यांनी भाजपाला मोठेपणाही दिला. मात्र या सगळ्यात कार्यकर्ते दुखावत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे उर्वरित जागांवर ठाम राहिले. त्याच्या परिणामी दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ठाणे, कल्याण आणि नाशिक या जागा त्यांना मिळाल्या आहेत. या सगळ्या जागा आणि छत्रपती संभाजी नगर या महत्वाच्या ठिकाणी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व शिवसेना उबाठा यांच्यात सरळ लढत होणार आहे. ही भाजपाची व्यूहरचना की शिंदे यांचा आत्मविश्वास की आणखी काही, हे काळाच्या ओघात स्पष्ट होत जाईल. मात्र शिंदे यांचे बंडाचे धाडसी पाऊल हे शिवसेनेतील आजवरचे सगळ्यात मोठे बंड असल्याने त्यानंतर होणारी ही निवडणूक आजवरची सगळ्यात लक्षवेधी ठरणार आहे, हे निश्चित.छगन भुजबळ,राज ठाकरे आणि नारायण राणे यांनीही बंड केले. मात्र त्यांच्याबरोबर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक बाहेर पडले. त्यापॆक्षा एकनाथ शिंदे यांचे पाऊल फार फार मोठे आहे.हे भाजपाला निदान मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत तरी विसरून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीकडे पाहायला हवे.

यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपा २८ जागा लढवत आहे आणि शिंदे १५ तर अजित पवार ४ आणि रासपचे जानकर १. सन २०१९च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि (अखंड) शिवसेना यांची युती होती. भाजपने तेव्हा २५ तर शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या आणि अनुक्रमे २३ व १८ जागा जिंकल्या होत्या. भाजपाचा आत्मविश्वास वगळला तर गेल्या निवडणुकीसारखे यावेळी काहीच नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन तुकडे झाले आहेत. विदर्भातील दोन जागा वगळता काँग्रेसकडे आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळेल, असा काहींचा अंदाज आहे. तो यथार्थ आहे का, की भाजपाचे (आणि महायुतीचे) पारडे फारच जड झाले आहे? नाशिकमधील लढतीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो ? या आणि उत्तर महाराष्ट्रातील अन्य सात लढतींबद्दल (पुढच्या भागात)…
– सुधीर कावळे(ज्येष्ठ पत्रकार)Mo-9423157510

 

Sudhir Kavle
सुधीर कावळे(ज्येष्ठ पत्रकार)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.