उपचार देणाऱ्या डॉक्टरांना ‘सरप्राईज’
रुग्णाने मानले एसएमबीटीच्या डॉक्टरांचे अनोखे आभार उपचार घेत असताना रेखाटले चित्र
नाशिक,दि. २६ डिसेंबर २०२२ -घराची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले. अनेक दवाखान्यांत घिरट्या घातल्या मात्र कुठे खर्च परवडेनासा तर कुठे निदान होत नव्हते. अखेर कंटाळून पुन्हा ते घरी परतले. यानंतर एसएमबीटी रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाचे दोन्हीही पायाच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण करण्यात आले. विशेष म्हणजे रुग्ण आता हालचालदेखील करू शकत असून नेहमीप्रमाणे चालू शकतो आहे. या रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांचे रेखाटलेले हुबेहूब छायाचित्र भेट देऊन या रुग्णाने अनोखे आभारप्रदर्शन केले….
घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मूळ रहिवाशी असलेले संदीप मुरलीधर बोधडे यांची. बोधडे सध्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे वास्तव्यास आहेत. ते टॅटू आर्टीस्ट व कलाकार आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी अनेक दवाखाने पालथे घातले. मात्र, दवाखान्याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता. यानंतर त्यांच्या एका मित्राने एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यानंतर ते एसएमबीटी मध्ये दाखल झाले. त्यांनी ओपीडीमध्ये डॉक्टर मनोज काशिद यांच्याकडे तपासणी केली. सर्व घरची परिस्थिती आणि आतापर्यंत विविध दवाखान्यांत मारलेले हेलपाटे याबाबत सगळी धावपळ कथन केली.
येथील सांधेरोपण तज्ञ व अस्थिरोग तज्ञ डॉ. मनोज काशिद यांनी तात्काळ या रुग्णाला दवाखान्यात दाखल करून घेतले. थोड्याच दिवसांत त्यांचा खुबा सांधे रोपण करण्यात आले. महिन्याभारत दुसऱ्याही खुब्यावर शस्रक्रिया यशस्वी झाली. विशेष म्हणजे, सर्वकाही महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत झाल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला देखील सामोरे जायला लागले नाही.
दरम्यान, बोधले यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार करणाऱ्या डॉ मनोज काशिद यांचे अनोख्या प्रकारे आभार मानण्याचे ठरवले. त्यांना डॉ काशिद यांचा फोटो मिळत नव्हता; यानंतर त्यांनी सोशल मीडियात त्यांचे फोटो शोधले. फेसबुकवरून त्यांचा एक फोटो बोधले यांनी शोधून काढला. कुणालाही काहीही न सांगता या रुग्णाने डॉ काशिद यांचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली.
शस्रक्रीयेच्या चार पाच दिवसांनी जेव्हा डॉ काशिद या रुग्णाला भेटण्यासाठी आले, तेव्हा बोधले यांनी एका कागदावर डॉ काशिद यांचे पेन्सिलीच्या सहाय्याने रेखाटलेले एक चित्र त्यांना भेट दिले. हे चित्र हुबेहुब डॉ. काशिद यांचेच असल्याचे पाहून उपस्थित डॉक्टरांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आपण कधी चालू शकू की नाही असा काही दिवसांपूर्वी प्रश्न पडलेल्या बोदडे यांना चालता येऊ लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यानंतर बोधले यांनी येथील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चित्र रेखाटून दिले. वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटल मध्ये सर्वच विभागात दररोज उपचार होत आहेत. अनेक क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या शस्रक्रिया इथे करणे शक्य झाले आहे.
या रुग्णाचे वय कमी होते म्हणून मला या रुग्णाला चालताना बघायचे होते. आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने दोन्ही ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. या रुग्णाने माझे व पत्नीचे जे हुबेहूब चित्र रेखाटले यामुळे खरच मी भारावलो. रुग्णांच्या प्रति डॉक्टरांचे असलेले कष्ट आणि डॉक्टरांच्या प्रति रुग्णांचे असलेले प्रेम यातून दिसते. अनेक रुग्ण येतात त्यांच्याकडून आपण केलेल्या उपचारांची दखल घेतली जाते. दोन गोड शब्द कानावर आले की केलेल्या कार्याचे चीज झाले असे मी मानतो.
-डॉ मनोज काशिद, सांधेरोपण व अस्थिरोग तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल
दीड वर्षांत शस्रक्रियांचा विक्रमएसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षांत ४३२ रुग्णांवर यशस्वी सांधेरोपण शस्रक्रिया (गुडघे व खुबा प्रत्यारोपण) करण्यात आली आहे. यामध्ये अनेक क्लिष्ट स्वरुपाच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. एसएमबीटी हॉस्पिटल मध्ये होत असलेल्या शस्त्रक्रियांचा तळागाळातील सर्वसामान्य रुग्णांना अधिक फायदा झाला आहे. उत्तर महाराष्ट्रसह ठाणे पालघरमध्ये आयोजित विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून अनेक आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. हॉस्पिटलची वैशिष्ट्येएसएमबीटी हॉस्पिटलमध्ये १ हजार बेडचा आंतररुग्ण विभाग, १०० आयसीयू बेड, १३ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक कॅथलॅब, १० एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड, २४ तास डायलिसिस सुविधा, २४ तास औषधालय सेवा, रुग्णांसाठी जेवणाची सुविधा मोफत, रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची सोय, २४ तास रुग्णवाहिका, २४ तास रक्तपेढी खुली आहे.