नाशिक,दि,४ फेब्रुवारी २०२४ –पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाशिककरांसाठी आज रविवार दिनांक ४ फेब्रुवारीला ‘तालाभिषेक बैठक ’ या छोटेखानी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. तालाभिषेक बैठक द्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.
आज रविवार , दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ६ वा स्वगत सभागृह, कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे आयोजित केली आहे. या मैफिलीत मुंबईचे युवा शास्त्रीय गिटार वादक अभिषेक प्रभू यांचे वादन होणार आहे.त्यांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण वयाच्या सहाव्या वर्षी पंडित दिलीप अमृते यांच्याकडे झाले. तसेच पाश्चात्य संगीताचे शिक्षण पं . रवी अय्यर यांच्याकडे झाले आहे. सध्या ते सतार वादक उ. रफिक खान (मंगलोर)यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. गिटार या पाश्चात्य वाद्यावर संशोधन करून स्वतःची ‘अबीर गिटार ‘हे नवीन वाद्य प्रचलित केले आहे. भारतभर अनेक प्रतिष्ठित महोत्सवांत स्वतंत्र वादनाबरोबरच संगीत क्षेत्रातील बेला शेंडे ,अवधूत गुप्ते, सुदेश भोसले अशा अनेक मान्यवरांना त्यांनी साथसंगत केली आहे. यासोबतच ते विद्यादानाचे कार्य करत आहेत. त्यांना अद्वय पवार (तबला ) साथ करतील.
यानंतर अकादमीचे विद्यार्थी कै . पंडित भानुदासजी पवार ,पं . नितीन पवार व तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य सुजीत काळे यांचे स्वतंत्र तबलावादन होईल. सुजीत काळे यांस २००९ मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची तबला विषयासाठी शिष्यवृत्ती मिळालेली असून नुकतीच त्यांना प्रसार भारतीची प्रतिष्ठेची A ग्रेड प्राप्त झाली आहे. त्यांनी सुवर्णपदक सह तबला विषयात एम ए केलेले असून त्यानंतर पर्कशन इंस्ट्रुमेंट्स विषयात UGC NET परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. भारतभर स्वतंत्र तबलावादनासोबतच कंठसंगीत ,वाद्यसंगीत तसेच कथक नृत्यातील अनेक मान्यवर कलाकारांना साथसंगत केली आहे. सध्या ते के.के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे तबला विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून देश तसेच परदेशातील विद्यार्थ्यांना तबला प्रशिक्षणाचे कार्य करत आहेत.त्यांना ईश्वरी दसककर (संवादिनी ) साथ करणार आहे .
कार्यक्रमाचे संयोजन अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार ,एस.डब्ल्यू.एस.फायनान्शिअल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांनी केले आहे.