नाशिक,दि. २३ ऑगस्ट २०२३ –कथक नृत्याचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संवर्धनाचा ‘ध्यास’ घेतलेली कीर्ती कला मंदिर ही नृत्य संस्था गेली तीन दशके गुरु नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे अखंडपणे आयोजन करते आहे. या नृत्योत्सवामुळे दिग्गज कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांच्या कलेला दाद देणारा एक सुजाण रसिक तयार झाला आहे. दि २६ ते २८ ऑगस्ट रोजी अनुक्रमे परशुराम सायखेडकर नाट्यगृह, औरंगाबादकर सभागृह आणि महाकवी कालिदास कला मंदिर येथे दररोज सायंकाळी ६ वाजता हा नृत्य उत्सव होणार आहे. अभिजात शास्त्रीय नृत्याच्या समृद्ध परंपरेची जपणूक करतानाच प्रयोगशीलता आणि नाविन्याचा “ध्यास” यांचा सुरेख मेळ या महोत्सवात दरवर्षी नाशिककर अनुभवतात.
महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे अविनय मुखर्जी यांचे एकल नृत्य आणि श्रुती देवधर, मृदुला तारे यांच्या युगल नृत्याने .अविनव मुखर्जी हे सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि जेष्ठ गुरू गीतांजली लाल यांचे शागीर्द. आपल्या गुरुकडे अविनवने १४ वर्षे नृत्य तपश्चर्या केली. कठोर साधनेतून स्वतःची ओळख तयार केली. आघाडीचा युवा कलाकार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. दूरदर्शनचे श्रेणी प्राप्त कलाकार आहेतच त्याच बरोबर देश विदेशातही त्यांनी त्यांचा चाहता वर्ग तयार केला आहे. जयपूर घराण्याच्या पारंपारिक रचनांचा नृत्याविष्कार नाशिककरांना अनुभवता येणार आहे.
महोत्सवाच्या प्रथम सत्राचा प्रारंभ कीर्ती कला मंदिराच्या ज्येष्ठ नृत्यांगना आदिती पानसे त्यांच्या शिष्या श्रुती देवधर आणि मृदुला तारे यांच्या युगल नृत्याने होणार आहे. दोघींनी अ.भा.गां. म. वि. मंडळाची विशारद पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली असून रामटेक युनिव्हसिटीची फाईन आर्ट एम.ए. पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली आहे. कीर्ती कला मंदिराच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो २०२३ च्या भारताच्या प्रजासत्ताक दिनी मा. राष्ट्रपती आणि मा. पंतप्रधानांच्या सन्माननीय उपस्थितीत राजपथावर कथक प्रस्तुतीचे भाग्य या दोघींना मिळाले आहे.
दिनांक २७ रोजी ‘इटरनल बॉंड’.औरंगाबादकर सभागृहात विदुषी गुरु रोहिणीताई भाटे यांच्या नृत्य प्रवासाचां दुर्मिळ आणि असामान्य माहितीपट त्यांच्या शिष्या नीलिमा आध्ये यांच्या प्रात्यक्षिकासह बघण्याचा लाभ नृत्य प्रेमींना, नृत्य अभ्यासकांना घेता येणार आहे. शास्त्रीय नृत्य म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर तो एक विचार आहे. त्याला शास्त्रीय चौकट आहे परंपरा आहे आणि तरीही सहज उत्स्फूर्ततेन ही कला सजली आहे. याचं भान आजच्या नृत्यअभ्यासकांना असावं हा शास्त्रीय नृत्याचा संस्कार पुढच्या पिढीत झिरपावा त्याच ‘ध्यासा’तून होणारा हा गुरु शिष्याच्या आतुट नात्यांला उलगडणारा ‘इटरनल बॉड’ महोत्सवाचे आकर्षण बनला आहे.
दिनांक 28 रोजी नृत्य उत्सवाचा समारोप डॉक्टर टीना तांबे यांचे एकल नृत्य आणि गुरु रेखाताई नाडगौडा यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या ‘द व्हायब्रन्स'(The Vibrance) ह्या नृत्य संरचनेने होणार आहे. डॉक्टर टीना तांबे यांनी विशारद, अलंकार, M.A. या एकापेक्षा एक वरचढ पदव्या संपादन केल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टरेट ही मिळवली . त्यासाठी त्यांचा विषय होता ‘मीरेच्या काव्यातील कथक च्या संदर्भातील घटक’ अनेक निपुण आणि तज्ञ गुरूकडून नृत्यविद्या संपादन करून टीनाताईंनी स्वतःची नृत्य शैली तयार केली आहे.
‘The Vaibrance ‘अर्थात जल्लोष चैतन्याचा… रेखाताई नाडगौडाच्या संकल्पनेतून साकारणारी ही नृत्याकृती कीर्ती कला मंदिराच्या यशस्वी नृत्यांगना पेश करणार आहेत. या संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन पियू आरोळे करणार असून साथसंगत -तबला – चारुदत्त फडके, प्रदीप लवाटे, बल्लाळ चव्हाण , सत्यप्रकाश मिश्रा. गायन – रवींद्र साठे, त्यागराज खाडीलकर, श्रीरंग टेंबे, नागेश आडगावकर, विनय रामदासन, आशिष रानडे, मृण्मयी पाठक आणि ईश्वरी दस्सकर सतार – अनिरुद्ध जोशी , बासरी – सुनील अवचट हार्मोनियम – चिन्मय कोल्हटकर, श्रीरंग टेंबे , ईश्वरी दस्सकर पढंत अदिती पानसे आणि अवनी गद्रे
दिनांक २६,२७,२८ ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या या नृत्यउत्सवा च्या प्रवेश पत्रिका कार्यक्रमाच्या दिवशी नाट्यगृहावर उपलब्ध असतील.रसिकांनी नृत्याभ्यासकांनी महोत्सवाला दाद द्यावी असे आवाहन महोत्सवाच्या आयोजकांनी केले आहे.