नाशिक,दि.९ मे २०२३ – नाशिकच्या चित्रकार स्नेहल एकबोटे यांच्या ” Fragments On A Journey” चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दि.११ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध चित्रकार धनंजय गोवर्धने यांच्या हस्ते होणार आहे.हे प्रदर्शन गंगापूर रोड वरील कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक ११ मे २०२३ ते १४ मे २०२३ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ८.३० पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना
“Fragements On A Journey”
प्रवास या शब्दाची व्याप्ति खूप मोठी आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या प्रवासाचा आपण कायम विचार करतो. परंतू या पृथ्वीचे अनेक वर्षांपासून प्रवास सुरू आहे. पृथ्वीच्या प्रवासा बरोबरच तिच्यात असलेल्या वस्तूंचा, माणसांचा पण प्रवास अखंड सुरु आहे. ह्या अखंड प्रवासाचे काही खंड चित्र कलेच्या माध्यमातून मांडण्याचा,दाखवण्याचा प्रयत्न स्नेहल एकबोटे यांनी चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे म्हणूनच “ Fragments On A Journey “ चे प्रयोजन.
सगळ्यात मोठा प्रवास स्वतःच्या जीवनाचा असतो. जीवनाचाप्रवास करताना निसर्गाचे आणि मानवी मनाचे, परिस्थितीतून आलेले, असे अनेक अनुभव आलेत त्या भाव भावनांची अनुभूती रंग रेषांमधून आलेली आहे. हे अनुभव व त्यातून निर्माण होणारे विचार कल्लोळ यांची अभिव्यक्ती यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक कला ही वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असते. संगीत सूर तालातून येते, नृत्य ताल,ठेका,पदन्यास या माध्यमातून अवतरते. कथा,कविता, साहित्य शब्द माध्यमातून येते. तसेच चित्रकला ही रंग,रेषा,आकार,अवकाश,पोत या चित्र घटकांच्या मनस्वी मिलाफातून व्यक्त होणारी ही दृकभाषा आहे.
कला ही स्वान्त सुखाय असते, तसेच रसिकांपर्यंत जाऊन त्यांना एक वेगळा अनुभव देणारी पण असते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्नेहल ने आपल्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.