नाशिक,दि. ६ ऑक्टोबर २०२३- नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईटचा प्रकाशामुळे काही तरुणांच्या डोळ्यांवर मोठा आघात झाल्याचा दावा नेत्ररोग चिकित्सांकडून करण्यात आला.तर दुसऱ्या दिवशी जुलूसमध्ये देखील डीजे साऊंड सिस्टिमचा वापर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यामुळे संबंधित गणेश मंडळांसह जुलूस आयोजकांवर नाशिक पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.
आगामी काळात नवरात्री उत्सवात लेझर लाईट असो वा डीजे साऊंड सिस्टिम किंवा अन्य कुठलीही आवाजाची यंत्रणा असो, ज्यामुळे ध्वनीची कमाल मर्यादा पातळी ओलांडली जात असेल, अशा मंडळांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे.
मात्र आता गणेशोत्सव असो किंवा मग नवरात्र उत्सव असो किंवा मग अन्य कुठल्याही सण असो, यावेळी साउंडच्या मर्यादेची कमाल पातळी ओलांडली जात असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, यामुळे नवरात्रोत्सवासाठी काही वेगळे नियम राहणार नाही, असे नाशिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील कारवाईचे आदेश दिले आहेत.
आगामी नवरात्र उत्सव काळात रंगणाऱ्या दांडिया गरबा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी डीजे लावणाऱ्या मंडळांचा परवानगी अर्ज थेट रद्द केला जाणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळाचे धाबे दणाणले आहेत. यामुळे नवरात्रीत डीजेच्या आवाज मर्यादाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून नवरात्र उत्सव मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर नवरात्रीत विशेष पथकांची नियुक्ती असणार आहे.
ध्वनी प्रदूषण कोठेही खपवून घेतले जाणार नाही, लॉन्स असो किंवा एखादे हॉटेल अथवा मोकळे पटांगणावर दांडिया, गरबा सुरू असल्यास त्या ठिकाणी आवाजाची पातळी ही मर्यादेपेक्षा जास्त असता कामा नये, असे पोलिसांनी म्हटले आहे. अन्यथा संबंधित आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे.