‘विकास’ नावाचा माणूस हरवला आणि राजकारणातला विकास सापडेनासा झाला

0

अभय ओझरकर

विकास’ हे नाव एकेकाळी फारच आशेचं प्रतीक होतं. आपल्या मुलाचं आयुष्य उंचावावं, घरदार फुलावं, समाज पुढे जावा या स्वप्नातून अनेक पालक आपल्या मुलाला ‘विकास’ नाव ठेवत. त्या काळात फक्त माणसांचीच नव्हे, तर शहरातल्या चित्रपटगृहांची, संस्था-इमारतींचीही नावं विकास’ असायची. शहराच्या मध्यभागी उभं असलेलं ‘विकास चित्रपटगृह’ हे केवळ करमणुकीचं साधन नव्हतं, तर प्रगतीचं, आधुनिकतेचं, पुढे जाण्याचं प्रतीक होतं.

पण काळ बदलत गेला. चित्रपटगृह बंद पडलं. पडद्यावरचे नायक बदलले, प्रेक्षकांची अभिरुची बदलली आणि ‘विकास’ नावाचं ते थिएटरही इतिहासजमा झालं. त्याचबरोबर ‘विकास’ नावाचा तो माणूसही कुठेतरी गर्दीत हरवून गेला. आज ‘विकास’ हा शब्द उरला आहेतोही फक्त भाषणांपुरता. व्यासपीठांवरून, जाहिरातीतून, निवडणुकीच्या जाहीरनाम्यांतून तो सतत कानावर पडतो; पण प्रत्यक्षात विकास कुणालाच भेटलेला नाही, कुणाला दिसलेलाही नाही.

खरं तर आज विकास जर कुठे अचानक सापडला, तर लोक त्याच्यावर तुटून पडतील. इतकी वर्षं वाट पाहणाऱ्यांचा संयम सुटेल. कारण विकासाच्या नावावर सगळं झालंरस्ते खोदले गेले, घोषणा झाल्या, पक्ष बदलले; पण विकास मात्र दूरच राहिला. नाव घेत घेत आपण त्यालाच हरवून बसलो, असं म्हणावं लागेल.

राजकारणात तर ‘विकास’ हा शब्द इतका झिजला आहे की तो आता अर्थहीन वाटू लागला आहे. अलीकडेच आपल्या एका नेत्याने ‘विकासासाठी’ घर बदललं. विकास कुठे आहे, हे कुणालाच माहीत नाही; पण घर मात्र बदलत राहिलं. पत्ते बदलले, सोयी बदलल्या, पदं बदलली; विचार मात्र बहुतांशी जागेचेच राहिले.

असाच एक प्रसंग नुकताच नाशिकच्या राजकीय वर्तुळात घडला आणि त्याने पुन्हा एकदा ‘विकास’ या शब्दावर प्रश्नचिन्ह उभं केलं. नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. मनसेत मजल दरमजल करत स्थिरावलेले, कार्यकर्त्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेले नेते दिनकर पाटील यांनी अचानक भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

दिनकर पाटील हे नाशिकच्या राजकारणातलं मोठं नाव. लोकसभा, विधानसभा अशा अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी आपलं नशीब आजमावलं. सातपूर प्रभागातून अनेक वर्षं नगरसेवक म्हणून ते निवडून आले. महापालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, प्रशासनावर वचक ठेवला आणि सभागृहात आपली छाप पाडली. भाषणातील त्यांची खास शैली, मुद्देसूद आणि कधी कधी तिखट मांडणी यामुळे ते नाशिकपुरतेच नव्हे, तर महाराष्ट्रातही सुपरिचित झाले.

भाजपातून मनसेमध्ये आल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. मुंबईतील मनसेच्या एका मोठ्या सभेत दिनकर पाटील यांनी केलेलं भाषण आजही अनेकांना आठवतं. त्या सभेत त्यांनी राजकीय चौकार-षटकारांची अक्षरशः फटकेबाजी केली होती. उपस्थितांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता, नेतृत्व मिळाल्याची भावना निर्माण झाली होती.

अजून विशेष म्हणजे, आदल्या दिवशीच मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली होती. त्या आनंदात दिनकर पाटील यांनी पेढे वाटले, ढोल-ताशांच्या ठेक्यावर नाच केला. कार्यकर्त्यांना वाटलं, आता नाशिकचं राजकारण वेगळी दिशा घेणार.

पण दुसऱ्याच दिवशी सगळं चित्र पालटलं. अचानक दिनकर पाटील भाजपात दाखल झाले. चालत्या इंजिनमधून उतरून थेट कमळ हातात घेणं, ही घटना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हादरवणारी होती. एका रात्रीत असं काय घडलं, की इतक्या उत्साहाने साजरी केलेली युती, आणि दुसऱ्याच दिवशी पक्षांतरहा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.

मीडियाशी बोलताना, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच होतं—“मी विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला.” विचारसरणी बदलली का? कार्यकर्त्यांचं काय? कालपर्यंत केलेल्या भाषणांचं काय? या सगळ्या प्रश्नांवर एकच ढाल पुढे करण्यात आलीविकास.

काही दशकांपूर्वीचं राजकारण वेगळं होतं, असं अनेक जण म्हणतात. तेव्हा प्रत्येक नेता एका ठरावीक विचारसरणीशी बांधील असायचा. पक्ष बदलणं म्हणजे मोठा निर्णय मानला जायचा. आज मात्र पक्षांतर हा जणू रोजचा प्रकार झाला आहे. विचारांपेक्षा संधी महत्त्वाची ठरू लागली आहे. आणि त्या प्रत्येक संधीचं नाव एकचविकास.

दिनकर पाटील यांच्या बाबतीतही तोच प्रश्न उभा राहतो. हा विकास नेमका कोणाचा? आणि कोणता? शहराचा? पक्षाचा? की वैयक्तिक राजकीय कारकिर्दीचा? या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून मिळालेलं नाही.

आपल्या नावाप्रमाणेच दिनकरसूर्यमनसेतून अस्ताला गेला आणि कमळ घेऊन पुन्हा उदयाला आला, अशी उपरोधिक चर्चा सुरू झाली आहे. पण या उदयाबरोबर जनतेच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर भाजपात गेलेले दिनकर पाटील आता नाशिकच्या जनतेला नेमका कोणता विकास दाखवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कारण आज विकास हा ना नाव उरला आहे, ना ध्येय. तो केवळ एक घोषवाक्य झाला आहेआवाज आहे, पण देह नाही; छायाचित्र आहे, पण अस्तित्व नाही. आणि कदाचित म्हणूनच विकास सापडत नाही. कारण आपण सगळेच त्याचं नाव घेत घेत त्याला पुन्हा पुन्हा हरवून बसलो आहोत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!