नाशिक,दि. २३ जुलै २०२३ – महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे अनेक भागात पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. राज्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकवर वक्रदृष्टी फिरवली आहे.अद्यापही अपेक्षित पाऊस न झाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांसह नाशिककर आभाळाला आस लावून बसल्याचे चित्र आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
पावसाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी नाशिक जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जुलैचा अखेरचा टप्पा सुरू झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात सध्या केवळ ६२ टक्के इतक्याच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यांनी पेरणी केली आहे, त्या शेतकऱ्यांनाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मागील तीन दिवसात जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र याही वेळी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आठ दिवसांपासून कोकण पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे सलगच्या पावसामुळे या विभागांमधील नद्या नाले दुथडी भरून वाहत असून तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे आजही यवतमाळसह बुलढाणा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून बचाव कार्य सुरू आहे तर दुसरीकडे संततधार सुरु असताना नाशिक जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. नाशिक शहर परिसरात आजही काही हलक्या सरी वगळता पावसाने दडी मारली. त्यामुळे शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांची मोठी निराशा झाली असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत नाशिककर आज लावून बसले आहेत.
नाशिक जिल्ह्यात रोज ढगाळ वातावरण असते, पाऊस पडेल अशी आशादायी चित्र निर्माण होते. मात्र प्रत्येक वेळी पाऊस हुलकावणी देत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढील पाच दिवस सुद्धा नाशिक जिल्ह्याला कोणताही अलर्ट नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईच्या रीजनल मेट्रोलॉजिकल केंद्रातूनही आगामी पाच दिवसांचं पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात नाशिक जिल्ह्याला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही, त्यामुळे अजूनही नाशिकला पावसाची वाट पहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.