गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर,गंगापूर धरणातून ८४२८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी : नाशिकला ऑरेंज अलर्ट
नाशिक,दि २५ ऑगस्ट २०२४- नाशिकमध्ये संतधार सुरु असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर आलाय.२० दिवसांच्या विश्रांतीनंतर गोदावरी दुथडी भरून वाहतेय. दि. ४ आणि ५ ऑगस्ट रोजी गोदावरीला २०२४ वर्षाच्या मोसमातील पहिला पूर आला होता. त्यानंतर २४ ऑगस्टला दुसरा पूर आला असून पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील १० धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्याभरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून शनिवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. टप्पाटप्प्याने विसर्गात वाढ करून सायंकाळी ८ हजार ४२८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून तो आताही कायम आहे.
दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
गोदा काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले आहे.नदी काठावरील छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १० धरणांमधून विसर्ग सुरु
सध्या नाशिक, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अन्य तालुक्यातही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील १० धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ८ हजार ४२८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, दारणातून १४ हजार ४१६ क्यूसेक, भावलीतून ५८८ क्यूसेक भाम धरणातून २ हजार ९९०, गौतमी गोदावरीतून १ हजार ५९६, वालदेवीतून १०७, कडवातून ५ हजार ६२६, आळंदीतून ८० क्युसेक, भोजापूर धरणांतून १ हजार ५२४ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे तर नांदूर मधमेश्वर मधून ३९ हजार २ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
नाशिकला ऑरेंज अलर्ट
पुणे, सातारा – रविवार (२५ ऑगस्ट) अतिवृष्टी – रेड अलर्ट. पालघर, जळगाव, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा – (25, 25, 27 ऑगस्ट) मुसळधार – ऑरेंज अलर्ट.पालघर (26,27), ठाणे, सिंधुदूर्ग (27) रायगड, रत्नागिरी (28) धुळे (25,26) नगर, नंदुरबार (25), जळगाव (26), पुणे आणि सातारा (26,27), अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ (25 ते 28) – यलो अलर्ट