Nashik : नाशिकमध्ये संततधार : गोदावरीला पहिलाच पूर
गंगापूर धरणातून ९०८८ क्यूसेक ने विसर्ग सुरु:नदी काठावर राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा
नाशिक,दि ८ सप्टेंबर २०२३- अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काल मध्यरात्रीपासून पावसाने नाशिकसह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. नाशिकला पाणी पूरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.सध्या काहीवेळासाठी शहर परिसरात पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.
आज सकाळी एक वाजता ५२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलं. त्यानंतर लागलीच २ वाजता विसर्ग ५२० क्यूसेक ने वाढवून १०४० क्यूसेक करण्यात आला आहे. रात्री हाच विसर्ग ९०८८ करण्यात आल्याने नदी किनाऱ्यावरील रहिवाशांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
गोदावरीच्या पुराचे मापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला पुराचे पाणीच लागलेले नव्हते. मात्र काल रात्रीपासून पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु असल्याने आज रात्री दुतोंड्या मारुतीच्या कमरे पर्यंत पुराचे पाणी लागले आहे.