राष्ट्रपती भवनात नाशिकच्या शिल्पकाराचा मानाचा तुरा

संदीप लोंढे यांनी साकारलेला चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनावरण;नाशिकसाठी अभिमानाचा ऐतिहासिक क्षण

0

नाशिक,दि,२४ फेब्रुवारी २०२६ –Nashik Sculptor Sandeep Londhe नाशिकच्या शिल्पकलेचा झेंडा पुन्हा एकदा देशाच्या सर्वोच्च स्थानी फडकला आहे. नाशिकचे सुप्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारलेला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा थेट राष्ट्रपती भवन येथे विराजमान झाला आहे. या पुतळ्याचे अनावरण महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात पार पडले. हा क्षण केवळ लोंढे कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण नाशिककरांसाठी अभिमानाचा ठरला आहे.

२३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या भव्य सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. उपराष्ट्रपती राधाकृष्णनजी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत, जेपी नड्डा तसेच आयजीएनसीएचे अध्यक्ष सच्चिदानंद जोशी हे मंचावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संदीप लोंढे यांच्या कलाकृतीचे तोंडभरून कौतुक केले.

Nashik Sculptor Sandeep Londhe,Honorary statue of Nashik sculptor at Rashtrapati Bhavan

संदीप लोंढे(Nashik Sculptor Sandeep Londhe) हे नाशिकच्या प्रसिद्ध लोंढे घराण्याचे तिसऱ्या पिढीतील वारसदार आहेत. शिल्पकलेचा वारसा त्यांच्या रक्तातच आहे. अनेक वर्षांच्या परिश्रम, अभ्यास आणि कलाप्रेमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रपती भवनातून थेट त्यांना या महत्त्वाच्या कामासाठी निमंत्रण मिळणे हीच त्यांच्या कलेची पावती आहे. विशेष म्हणजे, संदीप लोंढे यांच्या मॉडेलची अंतिम निवड करण्यात आली. अनेक चाचण्या आणि सूक्ष्म परीक्षणानंतर हा अर्धपुतळा राष्ट्रपती भवनात स्थापित करण्यात आला.

चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वातंत्र्योत्तर भारतातील अत्यंत महत्त्वाचे नेते होते. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ठरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गांभीर्य, विद्वत्ता आणि राष्ट्रनिष्ठा या गुणांचे अचूक दर्शन या अर्धपुतळ्यातून घडते. चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील दूरदृष्टी आणि व्यक्तिमत्त्वातील स्थैर्य यांचे प्रभावी चित्रण संदीप लोंढे यांनी अत्यंत बारकाईने साकारले आहे.

“माझ्या आयुष्यातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. भारताच्या सर्वोच्च व्यक्तीच्या हस्ते माझ्या कलाकृतीचे अनावरण होणे, यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही,” अशा भावना संदीप लोंढे यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या या यशामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नाशिक ही धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेची नगरी म्हणून ओळखली जाते. आता शिल्पकलेच्या क्षेत्रातही नाशिकने आपली छाप देशपातळीवर उमटवली आहे. संदीप लोंढे यांच्या या यशामुळे येणाऱ्या पिढ्यांतील कलाकारांना नवी प्रेरणा मिळणार आहे. परिश्रम, सातत्य आणि कलेवरील निष्ठा यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ही कलाकृती.

नाशिकसाठी हा केवळ एक सन्मान नाही, तर कला, संस्कृती आणि परंपरेचा अभिमान आहे. राष्ट्रपती भवनात विराजमान झालेला हा अर्धपुतळा भविष्यातही नाशिकच्या कर्तृत्वाची साक्ष देत राहील.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!