नाशिक दि. २० मे २०२३ – नाशिकचे हवामान हे उत्कृष्ट द्राक्ष निर्मितीसाठी पोषक असल्याने नाशिक हे वाईन निर्मितीचे जागतिक केंद्र बनावे यासाठी नागरिक आणि सरकारने सामुदायिक प्रयत्न करावे आणि एक श्रीमंत, सुखी व समाधानी शहर अशी नाशिकची जगात ओळख व्हावी अशी अपेक्षा अमेरिकेचे प्रख्यात डॉ. रवी गोडसे यांनी व्यक्त केली.कोविडनंतर हृदयरोग वा अन्य व्याधी होणार या चिंतेने अनेक लोक त्रस्त आहेत या लोकांनी चिंता सोडून द्यावी आणि आनंदाने जगता येईल अशा छंदांचा अंगीकार करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
स्व. डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यान १९ वे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रायोजक बाळासाहेब आहेर, डॉ. पुष्कर लेले, सौ. वर्षाताई गोडसे आदी उपस्थित होते. डॉ. व्ही. आर. काकतकर, डॉ. प्रदीप पवार यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम संपन्न झाला.
अमेरिका येथील डॉ. रवी गोडसे यांनी वैद्यक शास्त्रातील विनोद या विषयावर आजचे पुष्प गुंफले.
व्याख्यानमालेचे माजी पदाधिकारी स्व. डॉ. वि. म. गोगटे यांचे सुपुत्र डॉ. विकास आणि विवेक गोगटे, रमेश देशमुख सर, कॉम्रेड कै. विनायक कऱ्हाडे यांच्या कन्या सौ. विद्या जोग,माजी पदाधिकारी विश्वास ठाकूर, डॉ. कैलास कमोद यांचा वक्ते डॉ. रवी गोडसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक संचलित होरायझन अकॅडमी (सि बी एस इ ), ओझर मिग या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र -प्रणम्य शिरसा देवम या गीतावर नृत्याविष्कार सादर केला. मुख्याध्यापिका :- सौ. निर्मला जाधव वर्गशिक्षक सौ. गौरी वाघुले, सौ. तेजस्विनी लहामगे, नृत्य शिक्षक:- कु.वैदेही किशोरकुमार पंडित, प्रदीप गोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बेणी यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार गणेश भोरे, सुनील गायकवाड, ऍड. हेमंत तुपे, संगीता बाफणा, उषा तांबे आदींनी केला.
लेखक, अभिनेते, निर्माते असलेले अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे यांनी आयुर्वेद आणि अलोपॅथी यातील फरक समजावून सांगितला. यशस्वी डॉक्टर कायम व्यस्त आणि गंभीर असतात हा भ्रम आहे असे त्यांनी सांगितल्यानंतर श्रोत्यांनी हसून दाद दिली. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक लहान लहान गोष्टी, चुटकुले आणि त्यांना आलेला अनुभव डॉक्टरांनी खुमासदारपणे मांडला.
ज्या गोष्टींमध्ये आपल्याला मजा असते तिथे पथ्य पाळूच नये. मजा करणारा दिवस जर घालवलाच नाही तर असं जगणं काय कामाचं? लहानसहान कामं करण्यात, मित्रांसोबत वेळ घालवणं हीच खरी मजा असं त्यांनी सांगितले. आपल्या पेशंट सोबत वेळ घालवणं ही मजा घेणारे डॉक्टर व्हा असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले. डॉक्टरांनी आपले छंद जपले पाहिजे तसेच पेशंटवर खूपच बंधनं लादू नये. डॉक्टरांनी आपल्या पेशंटसोबत हलके फुलके विनोद करून पेशंटला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढणे गरजेचे असते असे प्रतिपादन डॉ. गोडसे यांनी केले.
डॉ. गोडसे यांनी आपल्या विनोदी शैलीत वैद्यकीय क्षेत्रातील घडणारे अनेक प्रासंगिक विनोद कथन केले. अनेक शस्त्रक्रिया या विनोद निर्मितीमुळे टाळता येतात हे त्यांनी स्वानुभवावरून सांगितले. डॉ. रवी गोडसे यांनी आपल्या भाषणात ऊर्दू शेरो-शायरी, चारोळ्या, कविता आणि गाणी यांचा वापर करून श्रोत्यांना गंभीर अशा वैद्यकीय क्षेत्रातील गमतीजमती सांगितल्या. तुम्हाला आजार असतात, पण आजारांसाठी तुम्ही नाहीत असं सांगून श्रोत्यांना गंभीरपणे जगू नका, विनाकारण बंधन नको, कमीत कमी आणि आवश्यक त्याच टेस्ट करा, कमीत कमी गोळ्या औषध घ्या, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि आपलं दुःख वाटूच नका की लोक अनेक वर्षे ते चघळत बसतील असा बहुमोल सल्ला दिला. श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी अतिशय खुमासदार पणे उत्तरे दिली. डॉ. गोडसे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी नागरिकांनी आज प्रचंड गर्दी केली होती.
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात अफलातून ग्रुप प्रस्तुत ९० च्या दशकातील अविस्मरणीय गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मयूर टूकडीया, विशाल दाते, रेणुका बायस यांनी अतिशय बहारदार गाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आजचा कार्यक्रम
स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यान
१) वक्ते :- कॅप्टन नीलम इंगळे, एयर इंडिया पायलट, मुंबईविषय :- नभांगण
2) अनुभूती …. स्वर तालाचीसंकल्पना / दिग्दर्शन नितीन वारे , नितीन पवार