“अनियारा”च्या माध्यमातून नाशिककर अनुभवणार एक अनोखा नृत्यमय अनुभव
अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी तर्फे गुरूंना अभिवादन !
दिनांक १८,१९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाश्वती दीदी यांच्या कार्यशाळेचे आयोजन
नाशिक,१६,नोव्हेंबर २०२२ –अभिजात नृत्य, नाट्य, संगीत अकादमी हे नाव नाशिकला सुपरिचित आहे दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी नियमित पणे रसिकांना देण्यासाठी ! उद्या दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी “अनियारा”! एक अनोखा नृत्यमय अनुभव नाशिककर अनुभवणार आहेत.
अभिजात नृत्य नाट्य संगीत अकादमी च्या संचालिका नृत्यश्री विद्या देशपांडे आपल्या शिष्यांसमवेत आपले दोन्ही गुरूवर्य- पंडिता रोहिणी भाटे आणि पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना नृत्यरूप आदरांजली अर्पण करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात अभिजात च्या शिष्या आणि दुसर्या टप्प्यात विद्या दीदी व शाश्वती दीदी असा मणीकांचन योग “अनियारा “द्वारे जुळून आला आहे. महाराज जी आणि रोहिणी ताई अशा दोन दिग्गज गुरूंच्या शिदोरी तून मिळालेल्या बंदिशी आणि रचना विद्या दीदी आणि शिष्या सादर करणार आहेत.
महाराजजी आपल्यात सगुण रुपात नाहीत. या प्रचंड पोकळीला तर पर्याय कधीच उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु, ५४ वर्षे त्यांची छायासोबत केलेल्या विदुषी शाश्वती सेन या त्यांच्या ज्येष्ठतम शिष्या त्यानंतर प्रथमच एकल नृत्य प्रस्तुती करणार आहेत. त्यांच्या नृत्य आणि वाणीतून खुद्द महाराज जीच आपल्याला दर्शन देतील असे म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमासाठी संगतकार आहेत- तबल्यावर श्री.कल्याण पांडे आणि श्री.अमित मिश्रा. संवादिनी आणि गायनासाठी श्री.पुष्कराज भागवत. सितार साठी आहेत श्री. प्रतीक पंडित. या सोहोळ्याचे निवेदन करणार आहेत श्रीमती शायोंती तलवार.
हा कार्यक्रम १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता कालिदास कलामंदिर येथे संपन्न होत आहे. प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे. तसेच, दिनांक १८,१९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाश्वती दीदी यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बी.वाय. के कॉलेज मध्ये प्रिं.टि.ए.कुलकर्णी सभागृहात होणार आहे.
कलात्मकतेचा नितांत सुंदर अनुभव याची देही याचि डोळा घेण्यासाठी सर्व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अभिजात कडून करण्यात आले आहे.