“शब्द झुल्यातील गाणी”मैफिलीतून नाशिककरांनी अनुभवला शब्द सुरांचा उत्सव   

0

नाशिक – शब्द सुरांचा संगम असलेल्या शब्द झुल्यातील गाणी या सांगीतिक काव्य मैफिलीत नाशिककर रसिक चिंब भिजले.नुकतीच ही मैफिल कुसुमाग्रज स्मारक येथे रंगली.ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना नाशिकचे सुप्रसिद्ध गायक संगीतकार मिलिंद धटिंगण यांची होती.

कवितेचं गाणं होतांनाचा प्रवास फार प्रभावीपणे या कार्यक्रमात मांडला गेला ज्याला उपस्थित रसिकांची मनमुराद दाद मिळाली.पं. मकरंद हिंगणे यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.रिमझिम ही पुन्हा की या संगीता ठाकूर यांच्या रचनेवर आधारीत ध्वनी चित्रफीत रागिणी कामतीकर यांचे हस्ते प्रदर्शित करण्यात आली.त्याचे संगीत व गायन मिलिंद धटिंगण व राजश्री शिंपी यांचे होते तर पदन्यास डॉ सुमुखी अथणी यांचा होता.

आभा ,लाभले आम्हा ,कृष्ण कान्हा, कोजागिरी, श्रावण, कोमल गंधार, पेंटर, जरा धुंद गाणे आदी  रचनांना काव्य रसिकांनी भरभरून दाद दिली.कविता शिंगणे गायधनी यांची आभा ही लोकप्रिय रचना पुन्हा एकदा रसिकांनी अनुभवली.शब्दप्रधान गायकी, शास्त्रीय गायनाची बैठक आणि अतिशय समर्पक चाली असा त्रिवेणी संगम मिलिंद धटिंगण यांच्या सादरीकरणातून दिसला.त्यांना समर्थ साथ लाभली, तरल आवाजाच्या गायिका राजश्री शिंपी आणि रसिकप्रिय गायक विवेक केळकर यांची.उदयोन्मुख गायिका सुवर्णा क्षिरसागर यांनी पण तयारीने काव्यगायन  करून आपला ठसा उमटवला.

डॉ सुमुखी अथणी यांच्या पदन्यासातून एक -एक कविता उलगडत गेली आणि रसिक मंत्रमुग्ध झाले.मध्यमा गुर्जर आणि सागर बोरसे यांनी त्यांना समर्थ साथ दिली.डॉ स्मिता मालपुरे यांनी या काव्य संगीत उत्सवाचे सर्वांग सुंदर आणि अभ्यासपूर्ण निवेदन केले.

अनुराग केंगे ह्यांनी सर्व रचना पडद्यावर प्रभावीपणे सादर केल्याने रसिकांना दृकश्राव्य काव्यगायनाचा आनंद मिळाला. या मैफलीत नाशिकचे प्रसिद्ध कवि मिलिंद गांधी,राजू देसले,संगीता ठाकूर चव्हाण,कविता शिंगणे गायधनी,संजय कंक,स्वाती पाचपांडे,नंदकिशोर ठोंबरे ,सुशीला संकलेचा आणि कै पुष्कर चोळकर यांच्या कवितांचे सादरीकरण झाले.संगीत अनिल धुमाळ यांचे तर  रांगोळी सजावट पूजा बेलोकर यांची होती. ध्वनी संयोजन सचिन तिडकें यांनी केले.या कार्यक्रमास डी जे हंसवानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमास विश्वास बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर , बी एस एन एल जनरल मॅनेजर नितीन महाजन, डॉ सुधीर संकलेचा, डॉ मनोज शिंपी,प्रसिद्ध गायिका रागिणी  कामतीकर, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शब्द सुरांचा हा उत्सव असाच वारंवार नाशिककरांना अनुभवण्यास मिळावा असा मानस मान्यवरांनी व्यक्त केला.कृष्ण जन्माष्टमी चे औचित्य साधून कृष्ण कान्हा या सुशीला संकलेचा यांच्या मिलिंद धटिंगण यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनेने या शब्द झुल्याची सांगता झाली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.