महिला IPL लिलाव यादीत नाशिकच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकार यांचा समावेश 

0

नाशिक,८ फेब्रुवारी २०२३ – नाशिकरांसाठी आनंदची बातमी आहे.नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकार या दोन महिला क्रिकेट खेळाडूंचा येत्या पहिल्यावहिल्या महिलांच्या आय पी एल – वुमेन  प्रिमियर लीग – WPL – डबलु पी एल – च्या लिलाव यादीत निवड झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे १३ फेब्रुवारी रोजी वुमेन  प्रिमियर लीग – WPL चा पहिल्या हंगामासाठी हा लिलाव होणार आहे. माया सोनवणे व ईश्वरी सावकार या दोघींचा ही अनकॅपड  खेळाडूत समावेश असून दोघींनाही रुपये १० लाख इतकी कमीतकमी रिझर्व प्राइस मिळाली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माया सोनवणे व ईश्वरी सावकार यांच्यासह रसिका शिंदे , प्रियांका घोडके, साक्षी कानडी ,लक्ष्मी यादव  व  शाल्मली क्षत्रिय या एकूण सात खेळाडूंचे अर्ज बीसीसीआयतर्फे पहिल्या यादीसाठी  घेण्यात आले होते. त्यातून या लिलावाच्या अंतिम यादीत माया सोनवणे व ईश्वरी सावकार या दोघींची ही निवड झाली आहे.

या यादीत एकूण ४०९ भारतीय व न्यूझीलंड , साऊथ आफ्रिका,ऑस्ट्रेलिया , वेस्ट इंडिज , इंग्लंड , श्रीलंका , बांगलादेश , झिंबाब्वे, आयर्लंड  यासारख्या  देशांतील परदेशी महिला खेळाडू देखील आहेत. यातून ५ शहरांच्या नावाने ५ संघांचे चमू निवडले जाणार आहेत.

माया सोनवणे ही उत्तम फिरकीपटू लेग स्पिनर असून सलग दुसऱ्या वर्षी  प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती. मागच्या हंगामाआधी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार्‍या भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३५ खेळाडुंमध्ये निवड झाली होती.

ईश्वरी सावकार सलामीची फलंदाज असून तिने यंदा १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे  कर्णधारपद भूषवले.  त्याबरोबरच चॅलेंजर ट्रॉफी व त्यापाठोपाठ श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेतहि ईश्वरीने प्रभावी फलंदाजी केली होती.नाशिकचे क्रिकेट विश्व माया सोनवणे व ईश्वरी सावकारला हार्दिक शुभेच्छा देत, महिलांची  आय पी एल – वुमेन  प्रिमियर लीग – लिलावाची अपेक्षेसह, आतुरतेने वाट पाहत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.