नाशिक,१९ नोव्हेंबर २०२२- राज्यात पुणे, सातारासह, नशिकमध्ये थंडीचे आगमन झालं असून गेल्या काही दिवसांपासून पारा सातत्याने खाली उतरतोय नाशिकचे तपामन तीन दिवसांत १३ अंश सेल्सिअसवरून आज १०.४ अंशापर्यंत खाली घसरले आहे. तर आज निफाडमध्ये ८.१ सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
महाबळेश्वरात तापमान १०.४ अंशांवर पोहोचलंय. तर वेण्णालेक ६ अंशांवर घसरलंय. तिकडे धुळ्यातही तापमानात घट झालेय. धुळ्यात तापमान ८.२ अंशांवर पोहोचलंय. नाशिकमध्येही हुडहुडी भरलेय. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्यानं पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे.
वाढत्या थंडीमुळे नाशिकमध्ये व्यायाम शाळा जिम, जॉगिंग ट्रॅक हळूहळू गर्दीने फुलून जात असले तरी गोदा काठावर मात्र सकाळी रेलचेल कमी दिसत आहे. गोदा काठावरील मंदिरांच्या अवती भवती पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर, त्या अडून गोदावरीच्या पाण्यात डोकावणारी सूर्य किरण, त्यामुळे गोदेच्या पाण्याला जणू सोन्याचा मुलामा दिला आहे की काय असा भास होत आहे. पर्यटकही या थंडीचा आनंद घेत आहेत.