नाशिक – नाशिक क्रिकेट साठी अत्यंत अभिमानाची बातमी. नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणे ची भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी ( India probable ) निवड झाली आहे. नॅशनल क्रिकेट अकदमी ( NCA ) बंगलोर येथील संभाव्य ३५ खेळाडुंच्या ह्या शिबिरासाठी माया रवाना झाली आहे. १० ते २८ ऑगस्ट असा ह्या शिबिरचा कालावधी आहे.
सदर खेळाडुंमधुनच राष्ट्रीय महिला क्रिकेट निवड समिति ऑस्ट्रेलिया दौर्या साठी अंतिम भारतीय महिला संघ निवडणार आहे. २९ ऑगस्ट ला हा संघ रवाना होणार आहे. भारतीय महिला संघ ह्या ऑस्ट्रेलिया दौर्यात गुलाबी चेंडुवरील एक कसोटी सामना व ३ एकदिवसीय तसेच ३ टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे.
उत्कृष्ट लेगास्पिनर माया मधल्या फळीतील भरवशाची फलंदाज देखील आहे. पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती. २०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक १५ गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. ह्या सगळ्या कामगिरी च्या जोरावर मायाची मागील हंगामात प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती .
मुळची सिन्नरची असलेली माया सोनवणे , सिन्नरचे सुनील कानडी ह्यांच्यामुळे क्रिकेट कडे वळली .अगदी सुरुवातीपासूनच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर ह्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले . नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव, सिन्नर हे मायाचे प्रशिक्षक आहेत. घरच्या अतिशय साधारण परिस्थितितुन मायाने नाशिकला, क्रिकेट च्या वेडा मुळे न कंटाळता ये जा करीत प्रचंड जिद्दीच्या बळावर इथपर्यंत मजल मारली आहे. वयाच्या केवळ ११ व्या वर्षी च मायाची महाराष्ट्र संघासाठी निवड झाली होती. दुखापतीमुळे दुर्दैवाने मायाचे दोन हंगाम वाया गेले. एक अतिशय भरवशाची अष्टपैलु खेळाडु होण्याचे तिचे स्वप्न आहे. योगायोगाने पुर्वी कधीही न बघितलेल्या द आफ्रिकेच्या खास शैलीत गोलंदाजी करणार्या पॉल अॅडम्स प्रमाणेच माया उजव्या हाताने सुरेख लेग स्पिन टाकते.
महिला क्रिकेटमधील या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून माया सोनवणे चे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून भारतीय संघात निवड होण्यासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.