दत्ता पाटील लिखित,सचिन शिंदे दिग्दर्शित नाटकांचा ३० पासून ‘नाट्यचौफुला’

पुणे व ठाण्यात एकाच दिवशी चार नाटकांचे सलग सादरीकरण

0

नाशिक,दि,२९ ऑगस्ट २०२४- प्रायोगिक रंगभूमीचा परीघ गेल्या दशकभरात मुंबई-पुण्याबाहेर विस्तारल्याचा प्रत्यय देणारी नाशिकच्या दत्ता पाटील या वर्तमान पिढीतल्या नाटककाराने लिहिलेल्या व प्रयोगशील रंगकर्मी सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या हंडाभर चांदण्या, दगड आणि माती, कलगीतुरा, तो राजहंस एक या गाजलेल्या महत्वाच्या चार नाटकांचा ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक व अभिनेते अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून एकाच दिवसात सलग प्रयोगांचा अनोखा महोत्सव ‘नाट्यचौफुला’ या नावाने पुण्यात आणि ठाण्यात होत आहे.

पुणे येथील श्रीराम लागू रंगअवकाश या नाटयगृहात येत्या ३० ऑगस्ट रोजी आणि एक सप्टेंबरला ठाण्यातील काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृहात दुपारी २ ते रात्री दहा असे सलग हे नाट्यप्रयोग होत आहेत. पुणे येथे या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार डॉ. चंद्रशेखर फणसाळकर व प्रायोगिक रंगभूमीवरचा आजचा महत्वाचा दिग्दर्शक मोहित टाकळकर यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे येथील नाट्यचौफुलाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व ज्येष्ठ नाटककार प्रशांत दळवी उपस्थित राहणार आहेत. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणानंतर बदलत गेलेल्या ग्रामीण भूवास्तवाचा वर्तमान पट प्रभावीपणे मांडणारी ही एकाच नाटककाराची चार नाटके एकाच दिवशी सलग आठ तासांच्या सत्रात सादर होण्याचा हा मराठी रंगभूमीच्या इतिहासातील पहिलाच उपक्रम ठरेल. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगान्त’ या तीन नाटकांचा तीस वर्षांपूर्वी त्रिनाट्यधाराअंतर्गत एकाच दिवसात सलग नाट्यानुभव देणारा प्रयोग सादर झाला होता. या सुमारे आठ तासांच्या नाट्यत्रयीचे त्यावेळी अनेक प्रयोग झाले. त्यानंतर मराठी प्रायोगिक रंगभूमीवर दत्ता पाटीललिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित चार नाटकांचा सलग नाटयानुभव ‘नाट्यचौफुला’अंतर्गत रसिकांना घेता येणार आहे.

तब्बल चाळीस कलावंत आणि तंत्रज्ञ
या नाट्यचौफुला महोत्सवात चार नाटकांमिळून तंत्रज्ञ आणि अभिनेतेमिळून तब्बल चाळीस कलावंत सहभागी होत आहेत. यात प्रामुख्याने प्राजक्त देशमुख, अनिता दाते, ओंकार गोवर्धन, उमेश जगताप, अश्विनी कासार, धनंजय गोसावी, नुपूर सावजी, प्रणव प्रभाकर, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, अरुण इंगळे, दीप्ती चंद्रात्रे, हेमंत महाजन, अमेय बर्वे, हेमंत महाजन, ऋषिकेश गांगुर्डे, कविता देसाई, किरण राव, निलेश सुर्यवंशी, प्रवीण जाधव, राम वाणी, ऋषिकेश शेलार, श्रुती कापसे, शुभम लांडगे, विक्रम नांनावरे, कृष्णा शिरसाठ, हेमंत महाजन, बद्रिश कट्टी, कृतार्थ शेवगावकर,जयश्री जगताप, राजेंद्र उगले, प्रफुल्ल दीक्षित, लक्ष्मण कोकणे, रोहित सरोदे, चेतन बर्वे, निखिल मारणे, सौरभ महाजन, ललित कुलकर्णी, सागर अवटे, हृषिकेश गांगुर्डे, राहुल गायकवाड, माणिकनाना कानडे यांचा समावेश आहे.
चार नाटकांचे एकसमान सूत्र
या चार नाटकातील सामायिक स्थळांचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या ओळख नसलेल्या गावांचा आणि त्या गावातील माणसांचा आर्थिक मानसिक आणि सामाजिक आलेख ही नाटके अत्यंत प्रत्ययकारीपणे आपल्यापर्यंत पोहोचवतात. खेड्यांमधल्या अनेक समस्यांचे आणि त्या भौतिक समस्यांमुळे निर्माण झालेल्या अनेक शारीरिक मानसिक आर्थिक आणि भावनिक प्रश्नांचे तिढे ही नाटके आपल्यासमोर मांडतात. कमीत कमी संधींची उपलब्धता, उध्वस्त होत चाललेलं जीवनमान, दररोजची जगणे लढाई वाटावी अशी परिस्थिती,  यामधून आधुनिकतेच्या रेट्याखाली नष्ट होत जाणारा गावगाडा आणि तेथील लोक परंपरा, संवादांचे अभाव, एकारलेपण, अपरिहार्यपणे शहरांकडे घेतली जाणारी धाव आणि त्यातून तयार होत जाणारे अंतरंग आपल्याला या चारही नाटकांमधून दिसतं. दुष्काळातील होरपळ दाखवतानाच माणसामधील जगण्यासाठीच्या चिवटपणाचा प्रत्यय देणारं हंडाभर चांदण्या, शिकूनही अनेक संधीच्या अभावातून मानसिकदृष्ट्या खचून चाललेल्या शेतकऱ्यांच्या तरूण पिढीची जगण्यातील दोलायमानतेचं प्रभावी चित्रण करणारं तो राजहंस एक, जगात आस्तित्व आणि ओळखच नसल्यानं ती मिळवून देण्याच्या भाबड्या प्रयत्नात स्वत:चं आस्तित्वच पणाला लावणाऱ्या ग्रामीण तरूण पिढीचं यथार्थ दर्शन घडविणारं दगड आणि माती, जागतिकीकरणाच्या धबडग्यात लोप पावलेली जुन्या काळातील लोककला परंपरा नव्या विखंडित जगातील जगण्याला किमान लय मिळावी यासाठी पुनरूज्जीवित करण्याच्या धडपडीची संगीतमय गोष्ट मांडणारं कलगीतुरा अशी ही चार नाटके पुणे व ठाणेकर रसिकांना अनुभवायला मिळणार आहेत.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.