Navratri festival 2024:आजचा रंग मोरपंखी:पहा काय महत्व आहे मोरपंखी रंगाचे
आजचा रंग - मोरपंखी आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
आज विजया दशमी म्हणजे दसरा आज नवरात्रीची दहावी माळआजचा रंग मोरपंखी
मोरपंखी .., शब्दचं हळुवार आहे ना ?हिरव्या रंगातल सृजनत्व आणि निळ्या रंगातल स्थैर्य दोन्हींचा मिलाप म्हणजे मोरपिशी रंग.. डोळ्यांना प्रसन्नता, मनात विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास आणि सचोटी आणि याच बरोबर हिरव्या रंगाची आरोग्य संपन्नता आणि नावीन्य म्हणजे मोरपिशी रंग…
मोरपिशी रंग म्हणजे मोराच्या पिसाऱ्यात असणाऱ्या सगळ्या रंगांचे प्रतीक.. विधात्याने मोराला घडवताना त्याच्या पिसाऱ्यावर मुक्त हस्ताने रंगांची उधळण केली आणि त्यातून निळा आणि हिरव्या रंंगाच्या अतिशय लक्षवेधक विविध छटा निर्माण झाल्या… सौंदर्या शास्त्रानुसार हा एक परिपूर्ण रंग आहे.
मोरपिशी रंग मनाला उत्तेजना देतो..त्याच वेळी चित्त शांत आणि बुद्धी स्थिर राहण्यास मदत होते…जगण्यासाठी ही एक आदर्श स्थिति… या रंगामुळे आध्यात्मिक जाणीव होण्यास मदत होते…सर्व सकारात्मकता स्वीकारण्यासाठीचा मोकळेपणा आपोआप येतो….साक्षात श्रीकृष्णाने त्याच्या मस्तकी धारण केलेला हा रंग…त्याची भुरळ मनाला नाही पडली तरच नवल…
हा रंग स्त्रितल्या परिपूर्णतेचा रंग वाटतो…तो जसा श्रीकृष्णाला प्रिय तसाच तो विद्येच्या देवीला, सरस्वतीला ही प्रिय… संन्यस्त कार्तिकेयाला ही मयुर वाहन प्रिय…आदर्श स्त्रीत्वाचा रंग वाटतो मला हा…स्त्रीच्या परपक्वतेचा, तिच्यातल्या सृजनत्वाचा, नव उन्मेषचा आणि त्याच वेळी विचारांचा समन्वय साधणारा असा हा रंग… ज्या स्त्रिया हा रंग वापरतात त्यांना कल्पना असते की टिकवायला अतिशय अवघड असा हा रंग…जरा दुर्लक्ष कराल तर पोतेर करून टाकणारा हा रंग…
आपल्या अवती भवती आपण अशा मोरपिसी स्त्रिया बघू शकतो…त्याला आर्थिक परिस्थिती, शिक्षण, सामाजिक दर्जा अशी कोणतीही बंधन आड येत नाहीत… एखादी घरकाम किंवा मजुरी करणारी स्त्री पण तिच्या परिपक्वतेने, आपल्याला तिच्या रंगात रंगवून टाकू शकते तर कधी एखादी उच्च विद्या विभूषित स्त्री, तिच्या हळुवार प्रगल्भतेने आपल्याला मोहून टाकते…तर कधी एखादी साधी सरळ गृहिणी तिच्यातल्या मोरपिसी छटांनी आपल्याला चकित करते…
कालच्या दिवसापेक्षा स्वतःला आज एक पाऊल का होईना पण पुढे पाहू इच्छिणाऱ्या सगळ्या स्त्रियांचा रंग वाटतो मला हा…त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा आणि कष्ट घ्यायची तयारी असणाऱ्या स्त्रियांचा हा रंग…इतरांना आनंद देतानाच स्वतःची उन्नती साधणाऱ्या स्त्रीत्वाचा रंग… स्वतःला शोधू पाहणाऱ्या…आयुष्याचा अर्थ धुंडळणाऱ्या…आणि त्याच वेळी मनातला तो सृजनाचा हिरवा कोंब हळुवारपणे जपणाऱ्या…विचारांची पक्की बैठक असलेल्या तरीही नाविन्याची ओढ जपणाऱ्या अशा जिंदादिल स्त्रियांचा हा रंग…एखादा वसा जपावा तसा आयुष्यभर मनाचं मोरपीस जिवंत ठेवणाऱ्या स्त्रियांचा हा रंग…
त्या आदिशक्तीला कोटी कोटी प्रणाम!