नाशिक – नाशिक महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांनी आज दुपारी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. नाशिक महानगर पालिकेचा राजीव गांधी भवनात मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, बी. जे. सोनकांबळे, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
नाशिक महानगर पालिकेचा आयुक्त पदावरून कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. सटाण्यातील रहिवाशी आणि एलआयसीचे निवृत्त अधिकारी काळू शिवमण सोनवणे यांचे पवार हे जावई आहेत.मुंबईचे सहआयुक्त रमेश पवार यांची नाशिक महापालिकेत वर्णी लावताना नाशिकचे आयुक्त कैलास जाधव यांना शासनाने वेटींगवर ठेवले आहे. जाधव यांनी ठाण्यातील महत्वाच्या विभागात जाण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते.
रमेश पवार हे मुंबई महापालिकेत सहआयुक्त (सुधार) म्हणून ते सध्या कार्यरत होते. अभियांत्रिकीची पदवीधारक असलेल्या पवार अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी मुंबईतील व्हीजेटीआयमधून प्राप्त केली. पवार यांना महापालिकेतील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त म्हणून विविध खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.
अजॉय मेहता आणि प्रवीण परदेशी हे महापालिकेचे आयुक्त असताना पवारांनी आयुक्त कार्यालयाची जबाबदारी पाच वर्ष बखूबी निभावली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रारंभीच्या काळात आरोग्य विभागात त्यांनी अनेक महत्वपूर्ण कामे केलीत. मुंबई महापालिकेतील विविध योजनांच्या नियोजनात आणि अमलबजावणीत त्यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे.
सॅनिटायझर पिल्यामुळे चर्चेत !
मुंबई महापालिकेतील अर्थसंकल्पात शिक्षण मंडळाचे बजेट सादर करताना पाणी समजून अनावधानाने सॅनिटायझर पिल्यामुळे रमेश पवार चर्चेत आले होते. ही घटना ३ फेब्रुवारी २०२१ ची आहे.