नाशिक,दि,४ सप्टेंबर २०२४ –नाशिकच्या ‘नृत्यांगण’ कथक नृत्य संस्थेचा दोन दिवसीय आवर्तन महोत्सव उत्साहात पार पडणार आहे. आवर्तन महोत्सवाचे हे ९ वे वर्ष असून आज बुधवारी (दि.४ सप्टेंबर) संध्याकाळी ५:३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे आणि उद्या गुरुवारी (दि.५ सप्टेंबर) संध्याकाळी ५:३० कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज दि.४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५:३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरू कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्या “श्रीराम कथक मानस” ही कथकनृत्यप्रस्तुती सादर करणार आहेत. या वर्षी अयोध्येत रामलल्ला च्या मूर्तीची स्थापना करण्यात आली त्या निमित्ताने ही नृत्य प्रस्तुती श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. संत तुलसीदास रचित काही निवडक भक्तिपूर्ण रचना आणि कथक नृत्याच्या विविध पैलूंमध्ये जसे आमद , रामस्तुती परण , कवित्त , तिहाई , त्रिवट , गतनिकास , इ. रचनांमध्ये श्रीरामांच्या जीवन प्रवासातील प्रसंग यांचा एकत्रीत गोफ विणून “श्रीराम कथक मानस ” या नृत्य प्रस्तुतीची संकल्पना साकार करण्यात आली आहे. नाशिक मधील सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर कासार यांनी काही रचना संगीतबद्ध केल्या आहेत आणि गायन केले आहे. तबल्याची साथ कल्याण पांडे, सीतार ची साथ प्रतीक पंडित, जितेंद्र सोनवणे यांनी ( कीबोर्ड ) , बासरीची साथ मनोज गुरव यांची आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.५ सप्टेंबर रोजी कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृह येथे सायं. ५:३० वाजता नृत्यांगण कथक नृत्य संस्थेच्या “अवलोकन” या उपक्रमाअंतर्गत संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध ज्येष्ठ नृत्यांगना आणि गुरू पंडिता शमा भाटे यांचे प्रात्यक्षिकांसह व्याख्यान आयोजित केले आहे. कथक नृत्याचे विविध पैलू , त्यातील वैशिष्ठ्य, त्याची बलस्थानं आणि कथक नृत्यातील सौंदर्य या विषयावर पंडिता शमाताई भाटे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत , तसेच त्यांच्या शिष्या नृत्यप्रस्तुती करणार आहेत.ताल, लय, अभिनय आणि पदन्यासाचा सुरेख संगम दोन दिवस रसिक प्रेक्षकांना आणि नृत्य अभ्यासकांना अनुभवता येणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वानंद बेदरकर हे करणार आहेत