जातनिहाय जनगणना करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या – छगन भुजबळ

ठाण्यातील आगरी महोत्सव मैदानावर ओबीसी निर्धार महामेळावा

0

ठाणे,दि.१७ डिसेंबर २०२३ – एकीकडे ओबीसी समाजातून जातींना काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय तर दुसरीकडे ओबीसीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिंदे समिती कडून खोटे कुणबी दाखले देण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजातील बांधवांच राजकीय आरक्षण सुध्दा धोक्यात येईल. अगदी सरपंच सुद्धा कुणी होऊ शकणार नाही. ओबीसींना आरक्षणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांनी ओबीसी म्हणून एकत्र या आणि ओबीसी सर्व एक आहे हे दाखवून द्या असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज ठाण्यातील आगरी महोत्सव मैदान येथे ओबीसी निर्धार महामेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रकाश शेंडगे, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ.बबनराव तायवाडे, मुस्लिम ओबीसी महासंघाचे शब्बीर अन्सारी,प्रा.टी.पी.मुंडे,प्रा.राजाराम साळवी,आ. किसन कथोरे, आ.रईस शेख,आ.महेश चौघुले, शांताराम मोरे, समीर भुजबळ,  पंकज भुजबळ, सुरेश तावरे,योगेश म्हात्रे ,पांडुरंग भरोरा, जी.डी.तांडेल, दशरथ पाटील, रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे, यशवंत सोरे यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते आणि ओबीसी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,आगरी कोळी समाजाचे कुणबी समाजाचे उपकार आपल्यावर आहे.शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या ज्योतिबा फुले यांना १८८९ मध्ये मांडवी-कोळीवाडा येथे ‘महात्मा’ ही पदवी देणारे आगरी-कोळीच होते. भारतातला सर्वात मोठा शेतकरी संप १९३२ ते १९३९ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळकायदा निर्माण करणारे आगरी-कोळी लोकच होते.चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी-कोळी लोकच होते. स्वातंत्र्यानंतर लोकनेते मा.श्री.दि.बा.पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली सिडकोच्या अन्यायी भूसंपादनाविरोधात जासई येथे पाच हुतात्मे देऊन संपूर्ण भारतात कुठेही लागू नसलेली साडेबारा टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देणारी पुनर्वसन योजना साकार करणारे आगरी-कोळी लोकच असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आगरी-कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या व भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच पेशव्यांनीही आगरी-कोळी बांधवांमधील धैर्य, काटकपणा आणि प्राण पणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये सहभागी करून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर कल्याण-भिवंडी पादाक्रांत केली. त्यानंतर पोर्तुगीज कारागिरांच्या साथीला आगरी-कोळी बांधवांना देत जहाजबांधणी सुरू केली होती.मुरुड-जंजिरा मोहिमेत १६७५ मध्ये कुलाब्याचे लायजी पाटील यांनी किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्याची अशक्यप्राय कामगिरी केली. मात्र, वेळेवर सैन्य न आल्यामुळे विजय हुकला होता.

लायजी पाटील यांच्या पराक्रमाची दखल छत्रपती शिवाजी महाराजांनी घेऊन त्यांना रायगडावर सन्मान करून `पालखी’ नावाचे गलबत भेट दिले होते. सन १७३९ मध्ये द्रोणागिरीच्या मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी आगरी-कोळी भूमिपूत्रांची मोट बांधली होती. त्यातील ८०० सैनिकांची कुमक उरण-करंजा बेटावर तैनात केली. त्या ठिकाणी हल्ला करण्याचा इंग्रजांचा विचार होता. पण आगरी बांधवांच्या शौर्याची माहिती मिळाल्यावर इंग्रजांनी हल्ल्याचा विचार सोडून दिला असल्याचे म्हणाले.

OBC Reservation News/ Marathi News/Do a caste-wise census, let milk become water or water - Chhagan Bhujbal
ते म्हणाले की, पेशव्यांच्या काळात वसईच्या मोहिमेत चिमाजीआप्पांना आन ठाकूर व मान ठाकूर यांनी मदत केली होती. त्यांनी वसई किल्ल्याच्या बुरुजाला चिरे पाडून सुरूंग भरला होता. या सुरुंगाच्या स्फोटाने बुरुज उद्धवस्त होऊन मराठ्यांचे सैन्य किल्ल्यात घुसले. परंतु, आन व मान ठाकूर यांनी स्फोटात बलिदान दिले. बोळींजच्या दौराजी पाटील यांनीही वसईच्या मोहीमेत सहभाग घेतला होता. तर अंजुरच्या गंगाजी नाईक-अंजुरकर यांनीही पेशव्यांच्या सैन्याला मदत केली होती. पेशवा रघुनाथराव पेशवा यांनी अटकेपार झेंडा फडकविला होता. या मोहिमेतही ५० आगरी-कोळी योद्धे सहभागी असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, ओबीसींच्या आंदोलनात ॲड.जनार्दन पाटील साहेबांचं मोठ योगदान होत त्यांची आज आठवण येत आहे.आमचा विरोध मराठा समाजाला नाही. आमदारांची घर जाळणाऱ्याना आमचा विरोध आहे. आमचा विरोध दादागिरीला, झुंडशाहिला आहे, राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या आमचा विरोध आहे असल्याचे त्यांनी सांगितले.आमची लायकी नाही असं म्हणणाऱ्यानी लक्षात घ्यावं की आमची ओबीसीची मुलं तुमच्या पेक्षा अधिक हुशार आहे. त्यामुळे आमची लायकी काढणारा तू कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हल्ला करणारे हे नेमकी कोण आहे असा सवाल करत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मावळ्यांचा इतिहास म्हणून लिहिला जातो. ते मावळे आम्ही आहोत. त्यांच्या सैन्यात अठरा पगड समाजातील मावळे होते. कुठल्या एका जातीचे नाही असे त्यांनी नमूद केले.आम्हाला गाव बंदी केली गेली परंतु काही नेत्यांना मात्र गावबंदी नाही. तरी राज्यात अशांतता निर्माण आम्ही करतोय असं म्हटल जातय. प्रत्यक्षात मात्र आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जाताय तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही असा सवाल उपस्थित करत शासन किती त्याच्या पाया पडणार, किती डोक्यावर चढवणार, सरकार किती झुकणार ही लोकशाही आहे की, लोकशाहीची थट्टा आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, ओबीसींना २७ टक्के आरक्षण असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप पर्यंत ९ टक्के देखील नोकऱ्यांमध्ये संधी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने पहिल्यांदा नोकऱ्यांमधील ओबीसींचा अनुशेष भरावा असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, मराठा नेत्यांनी जरांगेची भेट घेऊन ते हे का नाही सांगत की, ओबीसी आरक्षणातून वाटा मागणे चूक आहे,जाळपोळ करणे चूक आहे,जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यांसोबत संबंध ठेवणे चूक आहे, पोलिसांवर हल्ला करणे चूक आहे, गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकणे चूक आहे, गावबंदी करणे चूक आहे,एका समाजाच्या मागणीसाठी शहर बंद जाहीर करून इतर सर्व लोकांना वेठीस धरणे चूक आहे,अमुक अमुक तरखेपर्यंतच आरक्षण द्या अशी बालिश मागणी धरून शासनाला धमकी देणे चूक आहे, सरसकट कुणबीची मागणी करून आरक्षण मिळवण्याची प्रक्रियाला फाटा मारून ओबीसींच्या ताटातले आरक्षण मागणे बेकायदेशीर आणि चूक आहे असे सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, माझा कार्यक्रम करू असे म्हणणाऱ्या जरांगेनी पहिले अरे तू तुझी तब्येत सांभाळ अशी टीका केली. माझा कार्यक्रम करील त्याला मी अजिबात घाबरत नाही. मात्र जे ओबीसींच्या विरोधात बोलताय त्यांचा येणाऱ्या निवडणुकीत कार्यक्रम केल्याशिवाय राहू नका, माझी वाट न बघता ठीक ठिकाणी सभा सुरू ठेवा. ओबीसीला जागे करा आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढाईची तयारी करा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.