बालासोर,दि. ३ जून २०२३ – चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली असतांना ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. या अपघातात तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकल्या त्यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे.सुरुवातीला कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाल्याने काल हा भीषण अपघात झाला.
बालासोरमध्ये दोन गाड्यांची टक्कर नाही तर तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झाली. या अपघातात २३८ हून अधिक जणांच्या मृत्यूची माहिती समोर येते. बचाव पथकाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. शेकडो जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी काम करत आहेत. देशभरातून वेगवेगळी पथक ओडिशाला मदतीसाठी रवाना झाले आहेत. दुर्घटना खूप मोठी आहे. एका गाडीत जवळपास १६०० प्रवाशी होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, भारताच्या इतिहासातील ही सर्वात भयानक रेल्वे दुर्घटना आहे.
अपघात झाला तेव्हा या अपघातात ५० ते ७० लोक दगावल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशिरा हा आकडा १२०वर पोहोचला. तसेच जखमींचा आकडाही ३५० वर गेला. मात्र, सकाळपर्यंत मृतांचा आकडा २३८ आणि जखमींचा आकडा ९०० झाला आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे..
#WATCH | Aerial visuals from ANI’s drone camera show the extent of damage at the spot of the #BalasoreTrainAccident in Odisha. pic.twitter.com/8rf5E6qbQV
— ANI (@ANI) June 3, 2023
या ठिकाणी एनडीआरएफ, एनडीआरएफच्या टीम रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. तसेच ६०० ते ७०० रेस्क्यू फोर्सचे जवानही मदतकार्य करत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन रात्रभर सुरू होतं. अजूनही सुरू आहे. एकूण तीन ट्रेनची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात झाला. हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. सर्वात आधी हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली. त्यानंतर मालगाडी कोरोमांडलला जाऊन धडकली.
जखमींना सोरो सीएसी, गोपालपूर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या या रुटच्या सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मदतकार्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफची पाच पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत.
तसेच मृत आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी या ठिकाणी ५० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, जखमींची संख्या अधिक असल्याने रुग्णवाहिका सोबत काही बसेसही तैनात करण्यात आल्याचं ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं.
मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत : या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी ५० हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.