नाशिक,दि,८ जानेवारी २०२३ –‘शंकराचार्य न्यास, ग्रंथ तुमच्या दारी आणि चार चौघं’ यांच्या संयुक्त विद्यमाने‘अष्टौप्रहर स्वरहोत्र’ ‘बालाजी मंदिर, गंगापूर रोड, नाशिक येथे रविवार, दिनांक १४ जानेवारी सकाळी ७ वाजेपासून संक्रांतीला म्हणजेच सोमवार, दिनांक १५ जानेवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सतत २४ तास बालाजी चरणी ‘भारतीय अभिजात संगीत’ सेवा रुजू होणार आहे.
सोबत नृत्य, शिल्प, चित्र, रांगोळी,सुलेखन,दर्पण प्रतिमा सुलेखन आणि अक्षर समिधा अशा विविध कलाक्षेत्रातील कलाकार आपली कला प्रदर्शित करणार आहेत. मागील वर्षी १ जानेवारी २०२३ रोजी ‘श्री.काळाराम मंदिर’पंचवटी नाशिक येथे ही संकल्पना प्रथम राबवण्यात आली होती आणि शहरातील आणि बाहेरगावातून येणाऱ्या भक्त आणि रसिकांनी ‘रेकोर्ड ब्रेक’ गर्दी नोंदवली होती.
शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीकोनातून या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद लाभतो आहे. नाशिक शहराची एक नवीन ओळख निर्माण करणाऱ्या या ‘शास्त्रीय संगीत’ सेवेसाठी परराज्यातील कलाकारांची सेवा लाभणार आहे, हे विशेष!
‘शास्त्रीय संगीत सेवा’ या मूळ उद्देशाने सुरु झालेला हा उपक्रम भारतातील इतरही कलांचं संवर्धन करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक प्र्हराची सुरुवात त्या प्रहरानूसार पदन्यासाने होणार आहे. ‘विष्णू सहस्त्र नाम’ सुलेखन – पूजा गायधनी आणि त्यांचे विद्यार्थी, सुलेखनाची प्रात्यक्षिके – दा महेंद्र जगताप, दर्पण प्रतिमा सुलेखन – भाग्यश्री महंत, शिल्पकला प्रात्यक्षिक – यतीन पंडित, चित्र रेखाटन – चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी करणार आहेत. परिसर मंगलमय आणि सुशोभीत करण्यासाठी रांगोळीची जबाबदारी अनेक कलाकारांनी स्वीकारली आहे. रसिकांच्या स्वागताची जोरदार तयारी आयोजकांनी केली आहे.
शास्त्रीय संगीत साधक, गायक, वादक आणि रसिक यांच्या ‘साधना आणि सेवा’ याचा सन्मान आणि सामन्यांना शास्त्रीय संगीताची ओळख व्हावी या उद्देशाने कल्पिलेल्या या उपक्रमाचा पाया आपल्या नाशिक शहरात रचला, याचा समस्त नाशिककरांना सार्थ अभिमान आहे.