नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण केंद्रामार्फत देण्यात येणारे ‘बाबुराव बागूल कथा पुरस्कार’ जाहीर झाले असून २०१९ साठी हा पुरस्कार श्री किरण येले यांना ‘मोराची बायको’ या कथासंग्रहासाठी तर २०२० या वर्षाचा बाबुराव बागूल कथा पुरस्कार श्री बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरची नोंद’ या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.
प्रभारी कुलसचिव डॉ प्रकाश देशमुख आणि विद्यार्थी कल्याण केंद्राच्या प्रमुख डॉ. विजया पाटील यांनी ही घोषणा केली. मराठी साहित्यातील श्रेष्ठ साहित्यिक बाबुराव बागूल यांच्या नावाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नवोदित कथालेखकांना त्यांच्या प्रथम कथा संग्रहाला पुरस्कार देते. रुपये २१ हजार, स्मृतिचिन्ह, आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
किरण येले यांच्या कथा लेखनाला समाजिकतेचे उत्तम भान आहे. ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मोराची बायको या संग्रहातील त्यांच्या कथा स्वत:ची वेगळी वैशिष्ट्ये घेऊन येतात. रचना, आशय, उल्लेखनीय भाषाशैली, आणि नवतेची जाणीव त्यांच्या लेखनात आढळते. आनंद अंतरकर त्यांच्याविषयी म्हणतात, की ‘एखाद्या पीतस्फटिकातून पिवळ्या रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात, तसा विविध स्तरांवरील माणसांच्या, स्त्री पुरुषांच्या कथा सांगणारा ‘मोराची बायको’ हा कथासंग्रह एक अनोखा टोपाझ आहे’.
श्री. बालाजी सुतार हे आजच्या पिढीतले महत्वाचे लेखक. शब्द प्रकाशनने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरची नोंद’ या पहिल्याच कथासंग्रहातून मराठी लघुकथेला एक नाव आयाम त्यांनी दिला आहे. आशययुक्त विलक्षण भाषाशैली, नव्या बदललेल्या जगाकडे पाहण्याची अनोखी दृष्टी, ग्रामीण भागातील बदलांचे सूक्ष्म निरीक्षण आणि कथावस्तुतील विषय वैविध्य हा लेखक आपल्या कथामधून मांडतो. ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस श्री सुतार यांच्या या कथासंग्रहाबाबत म्हणतात, ‘लघुकथेच्या बंदिस्त परिघातून मराठी कथेला स्वत:चा मोकळा अवकाश प्राप्त करून देणाऱ्या आजच्या कथाकारात बालाजी सुतार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांचा हा कथासंग्रह आजच्या मराठी कथेला नवा स्वर प्राप्त करून देणारा आहे.’
पुरस्कार निवड समितीत डॉ. प्रज्ञा पवार, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विजया पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, श्री. प्रमोद बोरसरे यांचा समावेश होता. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.