नाशिक येथे कुंडलिनी जागृती व सहज साधनेचा चैतन्यमय सोहळ्याचे २ एप्रिलला आयोजन
कार्यक्रमासाठी देशविदेशातून हजारो भाविक उपस्थित राहणार
नाशिक,दि.२९ मार्च २०२३ – नाशिकच्या सहजयोग परिवारातर्फे एक भव्य दिव्य असा कुंडलिनी जागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक शहरात गोल्फ क्लब ग्राउंड वर रविवार दिनांक २ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे.हा कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमासाठी देशविदेशातून अनेक भाविक उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी खास दिल्लीहून प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून भारताच्या नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष, व गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकनोमिक्स एन्ड पोलिटिक्स चे चान्सलर, श्री राजीव कुमार उपस्थित राहणार आहेत. राजीव कुमार हे एक नामवंत अर्थतज्ज्ञ आहेत व त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था व राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर अनेक पुस्तके ही लिहिली आहेत. राजीव कुमार हे स्वतः सहज योगी आहेत व सहज ध्यान कसे करावे याचे मार्गदर्शन त्यांनी यापूर्वी ही अशा कार्यक्रमांमधे अनेक वेळा केले आहे. नाशिककरांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ प्राप्त करून घेण्याची सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार आहे.
सहजयोगाच्या संस्थापक प.पू. श्री माताजी निर्मला देवी यांनी १९७० पासून अनेकांना कुंडलिनी जागृतीची अनुभूती दिली आहे. यापूर्वी जागृती मिळवण्यासाठी फार श्रम करावे लागत असे. वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या व साधना करावी लागत असे. परंतु आता मात्र ध्यान व साधनेच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार देऊन श्री माताजींनी कुंडलिनी जागृती अगदी सहज व सोपी केली आहे. त्यामुळे सर्वांना ही अनुभूती घेता येते.
सहजयोगात आधी प्रचिती मिळते आणि मग पुढील प्रगती ची वाट दाखवली जाते. तीस-चाळीस वर्षांपासून सहजयोग करणारे अनेक योगी नाशिक मध्ये ही आहेत. सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा ही यात समावेश आहे. सहजयोगाचे नियमित ध्यान करणारे अनेक डाक्टर, इंजिनिअर, बिझनेसमन, लेखक, कलाकार त्यांच्या आयुष्यात सहजयोगामुळे आलेले सकारात्मक बदल सांगतात. विद्यार्थींना तर सहज ध्यान केल्याने एकाग्र चित्ताने अभ्यास करायला फार मदत मिळते.
ते म्हणतात “आम्हाला कुंडलिनी जागृती मिळाली तेंव्हा पासून आमच्या आयुष्यात सुख आणि समाधान आले आहे. आम्हाला उत्तम आरोग्य मिळाले आहे. आम्हाला मनःशांती मिळाली आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला बिकट परिस्थितीत संकटांचा सामना करण्यासाठी मनोबल मिळाले आहे. याची विशेष प्रचिती आम्हाला कोरोना काळात मिळाली. आम्ही फार भाग्यवान आहोत कारण ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेले पसायदान आम्हाला सहजयोगात न मागता मिळाले आहे. वसुधैव कुटुंबकम हा सर्व सहजयोगींचा विश्वास आहे. भेदभाव करत देशाच्या धर्माच्या किंवा इतर कोणत्याही सीमा रेषा सहजयोगी आखत नाही. त्यामुळे जे सुख आम्हाला मिळाले ते सुख सर्वांना मिळावे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. ”
कुंडलिनी जागृती बद्दल संत ज्ञानेश्वर माऊलींनी, संत नामदेव महाराजांनी, नवनाथांनी व अनेक संतांनी जे सांगितले ते आता प्रत्यक्ष अनुभवायची वेळ आली आहे. ज्ञान हे वाटण्यासाठीच आहे आणि ते वाटले गेलेच पाहिजे ही महाराष्ट्रातील संतांची परंपरा पाळत इथले सहजयोगी ही कुंडलिनी जागृतीचे ज्ञान स्वतः पुरता मर्यादित न ठेवता याबद्दल बोलणार आहेत व कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांना याची प्रचिती व अनुभूती देणार आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनाचे हेच प्रयोजन आहे.
सहजयोगात ज्ञान हे विनामूल्य दिलं जातं कारण अमूल्य ज्ञानाचे मोल येथे तरी केले जात नाही. कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य आहे याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. पूर्ण शहरात कार्यक्रमाचे सर्वत्र पोस्टर लावले आहेत. शहरातील लोक सुद्धा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. कलेक्टर कार्यालयातील अधिकारी तसेच अनेक उच्चपदस्थ अधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. सुमारे ५० हजार श्रोत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे व त्या अनुषंगाने गोल्फ क्लब ग्राउंड वर व्यवस्था करण्यात आली आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.