पिंपळपारावर स्वरसोहळा;उस्ताद अरमान खान यांच्या गायकीने उजळणार नाशिकची ‘पाडवा पहाट’
ज्येष्ठ रंगभूषाकार माणिक नाना कानडे यांचा ‘संस्कृती पुरस्कार २०२५’देऊन होणार सन्मान
नाशिक, दि. १६ऑक्टोबर २०२५ – (Padwa Pahat Nashik ) गोदाकाठच्या नाशिककरांना सूर-संगीताची पहाट अनुभवायला मिळणार आहे. संस्कृती नाशिक आयोजित ‘पाडवा पहाट २०२५’ या शास्त्रीय संगीत मैफलीचे हे २७ वे वर्ष, परंपरेइतकेच तेजस्वी आणि भावपूर्ण ठरणार आहे.
१९९८ च्या दीपावली पाडव्यापासून सुरू झालेली ही ‘पिंपळपारावरची पहाट’ (Padwa Pahat Nashik )आज नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहे. नेहरू चौकातील त्या ऐतिहासिक पिंपळपारावर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शास्त्रीय संगीतातील महान दिग्गजांनी आपला स्वराचा अमृतवर्षाव केला आहे.
या मंचावर स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गानतपस्वीनी किशोरी आमोणकर, पंडीता शोभा मुद्गल, पंडित राजन-साजन मिश्रा, पंडित मुकुल शिवपुत्र, तसेच स्वराधीश भरत बलवल्ली, पंडिता स्नीती मिश्रा, सुरेश वाडकर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी आपल्या गायकीने या भूमीला स्वरमाधुर्य दिले आहे.
या वर्षीच्या पाडवा पहाटेत, रामपूर-सहस्वान घराण्याचे सुप्रसिद्ध गायक, पद्मभूषण उस्ताद राशीद खान साहेबांचे सुपुत्र – युवा गायक उस्ताद अरमान खान यांच्या सुरेल सादरीकरणाने होणार आहे. पारंपरिक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला आधुनिकतेचा नवा रंग देणारे अरमान खान आज देश-विदेशात एक ‘ऊर्जावान तरुण गायक’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.त्यांच्या सोबत तबल्यावर उन्मेश बॅनर्जी, संवादिनीवर ओंकार अग्निहोत्री आणि बासरीवर रिक मुखर्जी यांची मनमोहक साथसंगत श्रोत्यांना लाभणार आहे.
यावेळी संस्कृती नाशिकतर्फे श्री माणिक नाना कानडे यांना ‘संस्कृती पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी गत ४८ वर्षांपासून सामाजिक व नाट्य क्षेत्रात वेशभूषा आणि रंगभूषेच्या माध्यमातून पडद्यामागील कार्याला कलात्मकतेची नवी दिशा दिली आहे.हा स्वरमहोत्सव बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी, पहाटे ५.३० वाजता पिंपळपारावर संपन्न होणार असून, नाशिकच्या संगीतप्रेमींसाठी ही स्वरयात्रा अविस्मरणीय ठरणार आहे.
संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी रसिकांना आवाहन केले आहे की, “या स्वरसोहळ्यात सहभागी होऊन उस्ताद अरमान खान यांच्या गायकीचा दिव्य अनुभव घ्या आणि नाशिकच्या या सांस्कृतिक परंपरेत आपला सहभाग नोंदवा.”
[…] […]