नाशिक – गायन क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमविणारे पं.अविराज तायडे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. ३ जून या दिवशी सायं. ५:३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि नाशिकच्या एसएमआरके महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख पं. डॉ. अविराज तायडे यांचा ‘अविस्मरणीय’ या शीर्षकाचा हा कथासंग्रह असून विनोदी कथा असे त्याचे स्वरूप आहे. नाशिकच्या ‘शब्दमल्हार प्रकाशना’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आजपर्यंत तायडे यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक विनोदी प्रसंगांवर या कथा आधारित असून शैलीदृष्ट्याही त्या वेगळ्या आहेत.
या संग्रहाच्या प्रकाशनासाठी ख्यातनाम कवी अशोक नायगावकर आणि व्यंगलेखक तंबी दुराई म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. तरी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ‘शब्दमल्हार प्रकाशन’ आणि तायडे कुटुंबीयांनी केले आहे.