नाशिक, दि. ६ सप्टेंबर २०२५ – Pandit Jayant Naik Passed Away : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रख्यात तबलावादक आणि ज्येष्ठ गुरु पं. जयंत नाईक यांचे मध्यरात्री १२:०५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. तालयोगी पं. सुरेशदादा तळवलकर यांचे ते जेष्ठ शिष्य मानले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे आणि असंख्य शिष्य परिवार आहे. आज सकाळी ९ वाजता नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वैयक्तिक पार्श्वभूमी (Pandit Jayant Naik Passed Away)
पं. जयंत नाईक यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला. संगीताची परंपरा त्यांच्या रक्तात होती. आजोबा त्रांबक नाईक हे स्वतः तबला वादक होते. त्यांनी तबल्याचे शिक्षण घेतले आणि संगीताच्या क्षेत्रात मोठा ठसा उमटवला. जवळपास ३० वर्षे त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, जळगाव आकाशवाणी केंद्रात ‘A’ ग्रेड तालवादक म्हणून कार्य केले.
पुरस्कार व सन्मान
त्यांच्या योगदानाचा गौरव अनेक वेळा झाला. त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार असे :
तालमणी पुरस्कार (सूरसिंगार संमिटद्वारे)
Tabla Alankar विशेष पुरस्कार
Tabla Bhushan Puraskar (२०१०, दिल्ली सोसायटी ऑफ म्युझिक)
या पुरस्कारांमधून त्यांच्या कलेला आणि तालविद्येतील योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.
संगीतविषयक योगदान
पं. जयंत नाईक हे एक कुशल एकल वादक तसेच साथसंगतकार म्हणून ओळखले जात.
त्यांनी अनेक प्रतिष्ठित मंचांवर तबलावादन केले –
भुसावल संगीत संमेलन (१९८०, १९८५, १९९०, १९९५)
बालगंधर्व संगीत संमेलन, जळगाव
NCPA, मुंबई
नेहरू सेंटर, मुंबई
याशिवाय उस्ताद जाकिर हुसेन यांच्या लोकमत वाढदिवस सोहळ्यात त्यांनी एकल तबलावादन करून प्रेक्षकांची दाद मिळवली होती.
महान कलाकारांसोबत सहयोग
पं. जयंत नाईक यांनी सुमारे ४० पेक्षा जास्त मैफलींमध्ये महान कलाकारांना साथसंगत दिली. त्यामध्ये –
पं. जितेंद्र अभिषेकी
पं. गजाननबुवा जोशी
पं. अजय पोहनकर
पं. राजन–साजन मिश्रा
पं. कुमार गंधर्व
द्रूभा घोष
तसेच लाइट म्युझिक आणि गझल क्षेत्रातही त्यांनी वादन केले. त्यांच्या साथसंगतीने हृदयनाथ मंगेशकर, रवींद्र साठे, शुबा जोशी, सरीता भावे, अनुराधा मराठे यांसारख्या गायकांना रंगत आली.
गुरुकुल परंपरा व शिक्षण योगदान
त्यांनी आपल्या जीवनात गुरूंचा सन्मान राखत गुरुकुल परंपरेचा वारसा पुढे नेला.सुरुवातीचे शिक्षण पं. विजय हिंगणे, उस्ताद हैदर शेख, श्री. विनायक फाटक, पं. नाना मुळे यांच्याकडून घेतले.
नंतर तालयोगी पं. सुरेशदादा तळवलकर यांच्याकडून त्यांनी उन्नत प्रशिक्षण घेतले.
सुरेशदादा यांचे ते ज्येष्ठ शिष्य होते.
त्यांनी “लय–ताल–विचार” या तत्त्वांवर आधारित शिक्षण पद्धती आत्मसात करून आपल्या शिष्यांना दिली. त्यांनी “खंड जाती तीन ताल,” “तिस्तर जाती रूपक,” आणि “तिस्तर जाती झप्ताल” या संशोधनात्मक शैली विकसित करून तबल्याच्या शिकवणुकीला नवे परिमाण दिले.
पं. नाईक यांचे असंख्य शिष्य आज संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यात –
निमिष घोलप
बल्लाळ चव्हाण
आदित्य कुलकर्णी
ओंकार भुसारे
सोहम गोरने
यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तबल्याची कला आत्मसात केली असून, विविध मंचांवर वादन करून गुरुंचा वारसा पुढे नेत आहेत.
संगीतविश्वाची अपूर्णता
पं. जयंत नाईक यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तबल्यावरील त्यांची पकड, जटिल लयींची मांडणी आणि गुरू-शिष्य परंपरेतून पुढे नेलेले योगदान यामुळे ते कायम लक्षात राहतील.नाशिकसह महाराष्ट्र आणि भारतभरातील संगीतप्रेमींनी त्यांच्या निधनाला एक अपूरा तोटा मानला आहे. शिष्य, रसिक आणि सहकारी कलाकार या सर्वांच्या डोळ्यांतून त्यांच्या आठवणींनी अश्रू दाटून आले आहेत.
पं. जयंत नाईक यांचे जीवन हे संगीतासाठी समर्पित होते. तबल्यावरील प्रभुत्व, संशोधनात्मक शैली, पुरस्कारांनी मिळवलेला मान आणि शिष्यपरंपरेतून दिलेले योगदान यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राने एक महान कलाकार आणि गुरू गमावला आहे.