नाशिक,दि,२९ मार्च २०२५ – पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित नाशिककरांसाठी ‘तालाभिषेक बैठक ’ या संगीत मैफिलीचे आयोजन दर दोन महिन्यांतून एकदा केले जाते. याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.
या उपक्रमातील आठवी बैठक आज शनिवार ,दि.२९ मार्च २०२५ रोजी सायं ६ वा विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे आयोजित केली आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध पखवाजवादक व्यंकटेश ढवण ,पी. एन. कुलकर्णी ,सौ. आशा कुलकर्णी आणि विनय मेहतर असतील.
मैफिलीच्या पूर्वार्धात पं. मकरंद हिंगणे यांचे शिष्य युवा गायक केतन इनामदार (नाशिक) यांचे गायन होईल. त्यांना हर्षद वडजे (संवादिनी ) आणि अद्वय पवार (तबला ) साथ करणार आहेत .या मैफिलीत उत्तरार्धात पं . नानासाहेब पानसे घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे प्रसिद्ध पखवाजवादक कृष्णा साळुंके (पुणे) यांचे पखवाज वादन होईल. त्यांचे प्रारंभिक शिक्षण श्री. विष्णुपंत लोंढे आणि श्री . भरत सोनगीर यांचेकडे झाले. तालयोगी पं सुरेश तळवलकर यांचेकडे ते पुढील शिक्षण घेत आहेत. त्यांनी भारतभर अनेक महत्वाच्या संगीत महोत्सवातून आपली कला सादर केली असून अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. धृपद गायन ,कथक तसेच भरतनाट्यम क्षेत्रातील अनेक मान्यवरांची पखवाज संगत त्यांनी केली आहे. पुणे येथे कृष्णनाद गुरुकुलाच्या माध्यमातून ते या कलेचा प्रचार व प्रसार करत आहेत. प्रशांत महाबळ त्यांना (संवादिनी ) साथ करतील.
कार्यक्रमाचे संयोजन अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार आणि एस.डब्ल्यू.एस.फायनान्शिअल सोल्युशन प्रा. ली. चे संचालक रघुवीर अधिकारी यांनी केले आहे