नाशिक,दि. १६ मार्च २०२३ – पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन आयोजित कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नाशिककरांसाठी जानेवारी महिन्यात प्रथमच ‘तालाभिषेक बैठक ’ या छोटेखानी संगीत मैफिलीचे आयोजन केले गेले. दर दोन महिन्यांतून एकदा असे या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे नवोदित तसेच प्रथितयश गायक व वादकांची कला जवळून अनुभवण्याची संधी संगीत रसिकांना मिळणार आहे.
या बैठकीचे दुसरे पुष्प शनिवार दि. १८ मार्च २०२३ रोजी सायं ६ वा कुसुमाग्रज स्मारक ,गंगापूर रोड येथे पूर्वार्धात अकादमीचा ज्येष्ठ विद्यार्थी आणि तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांचे शिष्य असलेले नाशिकचे प्रतिभावान युवा तबलावादक कुणाल काळे यांचे एकल तबलावादन होणार आहे.त्यांना ईश्वरी दसककर संवादिनी साथ करतील.
कुणाल काळे आकाशवाणीचे बी हाय ग्रेड कलाकार असून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे.भारतभर विविध ठिकाणी त्यांनी स्वतंत्र तबलावादन तसेच मैफिलीत साथसंगत केलेली आहे.
मैफिलीच्या उत्तरार्धात ठाणे येथील प्रसिद्ध युवा गायक आणि पं. राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांचे गायन(शास्त्रीय आणि नाट्यसंगीत)होईल. पंडित केदार बोडस यांचे शिष्य असलेले भाग्येश मराठे यांना महाराष्ट्र शासन ,NCPA मुंबई ,डॉ. वसंतराव देशपांडे ,रामकृष्ण वझे स्मृती पुरस्कार मिळालेले असून भारतभर त्यांनी अनेक मैफिलीतून आपले गायन सादर केले आहे. त्यांना ईश्वरी दसककर (संवादिनी) आणि सुजीत काळे (तबला) साथ करतील.
कार्यक्रमाचे संयोजन अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन संस्थेतर्फे करण्यात आले असून ह्या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . तरी नाशिककर रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पवार तबला अकादमीचे संचालक नितीन पवार ,एस.डब्ल्यू.एस.फायनान्शिअल सोल्युशन प्रा.ली.चे संचालक रघुवीर अधिकारी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांनी केले आहे.