नवी दिल्ली – देशातील सर्वसामान्य जनतेला सलग दुसऱ्या दिवशी महागाईचा झटका बसला आहे. आज दुसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० ते ८५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९७.०१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८८.२७ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १११.६७ रुपये आणि डिझेलचा दर ९५.८५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर १०६.३४ रुपये तर डिझेलचा दर ९१.४२ रुपये प्रति लीटर झाला आहे. तर चेन्नईतही पेट्रोल १०२.९१रुपये तर डिझेल ९२.९५ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
४ नोव्हेंबर २०२१ रोजी इंधनावरील कर कमी केल्याने देशात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर २१ मार्चपर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या, अखेर मंगळवारी इंधनाच्या किमती वाढवण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पुण्यात पेट्रोल ११०.६७ रुपये आणि डिझेल ९३.४५ रुपये लिटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०८.४३ तर डिझेल ८८.०८ रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये डिझेल प्रति लिटर ९४.१५ तर पेट्रोल १११.३७ रुपये प्रति लिटर आहे. नाशिक मध्ये एक लिटर पेट्रोल साठी १११.२४ रुपये तर डिझेलसाठी ९३.८३ रुपये मोजावे लागत आहेत.