‘कविता म्हणजे जीवनाचे प्रतिबिंब’ : प्रवीण दवणे
शब्दमल्हार प्रकाशित कविता गायधनी यांच्या संग्रहाचे प्रकाशन
नाशिक – कविता ही जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी देणारी ललितकला असून हळूवार उमलत जाणारे मन, त्या मनातील भावना ही अलगद टिपून घेत असते. कविता कागदावर अवतरणे म्हणजे संवेदनांनी शब्दरूप घेणे होय. असे प्रतिपादन ख्यातनाम कवी प्रवीण दवणे यांनी केले.
‘शब्दमल्हार’ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या कविता शिंगणे-गायधनी यांच्या ‘जिव्हाळ्याचे मेघ’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर, शब्दमल्हारचे संपादक स्वानंद बेदरकर आणि फणिंद्र मंडलिक उपस्थित होते.
गायधनी यांच्या कवितेतील वेगवेगळ्या आषय-विषयांच्या कवितांवर सविस्तर बोलताना दवणे म्हणाले की, ‘आयुष्य आणि कविता या दोन्ही दूरस्थ गोष्टी आहेत असे अनेकदा बोलले जाते. मात्र अंतर्मनातला जिव्हाळा, त्यातील भावभावनांचे विविध कंगोरे कविता या वाङ्मय प्रकारात बद्ध करण्याचे काम गायधनी यांनी केले आहे. स्त्रीच्या जिव्हाळापूर्ण डोळ्यांना जे दिसते ते इतर कुणाला दिसणे अवघड असते. अशा प्रतिभाशक्तीच्या अनेक छटा प्रस्तुत संग्रहात पाहावयास मिळतात. कवितारूपी झरोक्यातून आलेले किरण कवीबरोबरच वाचणार्यांचे आयुष्यही उजळून टाकत असतात. त्यामुळे कवितेकडे पाहाताना अतिशय जाणिवपूर्वक सजगतेने पाहिले पाहिजे.’
दवणे पुढे म्हणाले, ‘मराठी कवितेच्या प्रांगणात आलेला हा ‘जिव्हाळ्याचा मेघ’ प्रेरक आहे. समाधानाचा शांत नंदादीप या कवितेत नित्य तेवताना दिसतो. त्यामुळे गायधनी यांची कविता ताजी आणि उर्जादायी आहे.’योग्य शब्दाची, योग्य भावनांसाठी निवड करणे आणि वाचकांचे लक्ष बरोबर त्या संवेदनेकडे नेणे हे कविता गायधनी यांना साधले असल्याचे विश्वास ठाकूर यांनी नमूद केले. वेदनांचा बाऊ न करता किंवा आक्रस्ताळेपणाने आपले दु:ख न मांडता समंजसपणा हा या कवितेचा गुणधर्म असल्याचे स्वानंद बेदरकर म्हणाले. आपल्या पस्तीस वर्षांच्या काव्य वाटचालीबद्दल कविता गायधनी यांनी मनोगत व्यक्त केले. सुकन्या जोशी यांनी सूत्रसंचालन केले. भद्रकाली देवीच्या आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होऊन विवेक केळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या कविता गायधनी यांच्या कवितेवर सुमुखी अथणी यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सांगता झाली.