बीड, दि. १३ सप्टेंबर २०२५ – Pooja Gaikwad Confession गेवराई तालुक्यातील लुखमसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्लॉटिंग व्यवसायातून उभारी घेतलेल्या गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस चौकशीत या प्रकरणात अडकलेल्या नर्तकी पूजा गायकवाड हिने अखेर महत्त्वाची कबुली दिली आहे.
प्रेमसंबंधांची कबुली( Pooja Gaikwad Confession)
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पूजाने चौकशीत गोविंद बर्गे यांच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. मात्र, या संबंधांमुळे गोविंद यांच्यावर सतत पैशांची उधळपट्टी करण्याचा दबाव येत होता, अशी माहिती समोर आली.
पूजावर लाखोंची उधळपट्टी
गोविंद बर्गे यांनी पूजावर आणि तिच्या नातेवाईकांवर कोट्यवधींचा खर्च केला होता.तिच्या भावासाठी मोबाईल व बुलेट मोटारसायकल,आईसाठी सासरच्या गावी घर,मावशीसाठी वैराग येथे प्लॉट,नातेवाइकांच्या नावावर तीन एकर शेती,तसेच ८ लाख रुपये देऊन कला केंद्र सुरू करण्यासाठी मदत केल्याची माहिती उघड झाली आहे.तिच्या हट्टांमध्ये सोन्याचे दागिने, महागड्या भेटवस्तू यांचा समावेश होता. तरीही पूजाच्या मागण्या सतत वाढत होत्या.
गेवराईतील घरावरून वाद
गोविंद बर्गे यांनी गेवराई येथे बांधलेले आलिशान घर पूजाच्या नावावर करण्यासाठी ती दबाव टाकत होती. “माझा वाढदिवस जवळ आला आहे, त्यावेळी घर नावावर केलं नाही तर तुझ्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी पूजाने दिल्याचे बर्गे यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.
आत्महत्या की घातपात?(Govind Barge Suicide Case)
या सततच्या दबावामुळे मानसिक खचलेल्या गोविंद बर्गे यांनी मंगळवारी बार्शी (सोलापूर जिल्हा) येथे स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. कुटुंबीय आणि मित्रांनी या घटनेमागे कट असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
पूजावर गुन्हा दाखल
पोलिसांनी नर्तकी पूजा गायकवाडला अटक केली असून ती सध्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. चौकशीत तिने प्रेमसंबंध मान्य केले असले तरी तिच्या पैशांच्या मागण्यांमुळे बर्गे यांच्या आयुष्यात तणाव वाढल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा बहुआयामी तपास सुरू आहे.या घटनेने बीड जिल्हा आणि सोलापूर परिसरात प्रचंड खळबळ माजली असून, लोकांमध्ये संतापाची भावना आहे.