उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीकडे रवाना

0

नवी दिल्ली – यूक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशिया यूक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उत्तर प्रदेशचा दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यूक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक होण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या मुद्द्यावर उच्चस्तरिय बैठक बोलावली आहे.

रशिया यूक्रेनवर आक्रमकपणे हल्ला करत आहे. लाखो लोक यूक्रेन सोडत आहेत. हजारो भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. रशियाने यूक्रेनच्या ४७१ सैनिकांना अटक केल्याचा दावा केलाय. त्याचबरोबर यूक्रेनमधील ९७५ सैन्य तळ उद्ध्वस्त केल्याचा दावाही रशियाकडून करण्यात आलाय.दुसरीकडे यूक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानेही मोठा दावा केलाय. युद्धात रशियाचे ४ हजारच्या वर  सैनिक मारले गेल्याचा दावा यूक्रेनकडून करण्यात आलाय. त्याचबरोबर १४६ रणगाडे, २७ विमान आणि २६ हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचंही यूक्रेनकडून सांगण्यात आलंय.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या आज उत्तर प्रदेशात ३ मोठ्या निवडणूक रॅली होत्या. बस्ती आणि देवरियामधील रॅली केल्यानंतर मोदी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्येही रॅली केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.