पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ : सलग दुसऱ्यांना मिळाली संधी

सोमवारी होणार शपथविधी सोहळा

0

पाकिस्तान,दि,३ मार्च २०२४ –पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान निवडणुकीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्ये मतदान पार पडले. नॅशनल असेंबलीचे स्पीकर अयाज सादिक यांनी मतदानाची निकाल जाहीर केला.शरीफ यांच्याशिवाय, उमर अयूब खान यांनीही पंतप्रधानपदासाठी अर्ज केला होत. मात्र, रविवारी झालेल्या निवडणुकीत उमर अयुब खान यांना पुरेसा पाठिंबा मिळू शकला नाही. पीएमएल-एनने पीपीपी आणि एमक्यूएमसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.

निकालाची घोषणा करताना अयाज सादिक यांनी सांगितले की, शाहबाज शरीफ २०१ मते मिळवून दुसऱ्यांदा पंतप्रधान निवडण्यात आले आहे.तीन वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिलेले शाहबाज शरीफ २०२२ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधानमंत्री बनले होते. पंतप्रधान म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ १६ महिन्यांचा होता.

सोमवारी होणार शपथविधी सोहळा
शहबाज शरीफ हे एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधानही राहिले आहेत. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करुन सत्ता स्थापन केली होती. तुरुंगवास भोगत असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे उमेदवार उमर अयुब खान यांना ९२ मते मिळाली. यावेळी पीटीआय समर्थक खासदारांनी घोषणाबाजी केली. शाहबाज शरीफ यांचा शपथविधी सोहळा सोमवारी राष्ट्रपती भवनात होणार आहे.

पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याच्या आशेने तब्बल चार वर्षांनी पाकिस्तानात परतले. आपल्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि ते चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होतील, अशी आशा नवाझ शरीफ यांना होती. तथापि, ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना ९० पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यश आले. तर पीएमएल-एनला ७५ तर पीपीपीने ५४ जागा जिंकल्या.

स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पीएमएल-एनने बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पीपीपी पक्षासोबत आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तान आणि इस्तेहकाम-ए-पाकिस्तान पार्टीचाही या आघाडीत समावेश आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.