
मुंबई,दि.२३ ऑक्टोबर २०२५ – Punah Shivajiraje Bhosale मराठी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात भीती आणि थराराचं वादळ निर्माण करणार आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटातील सिद्धार्थचा लूक नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने निर्मात्यांनी सिद्धार्थचा लूक जाहीर करताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया ओघाने येऊ लागल्या. रक्ताने माखलेला चेहरा, व्रणांनी भरलेले कपाळ आणि भेदक नजरेतून झळकणारा दरारा — असं भीषण, पण तितकंच आकर्षक रूप यात दिसतं. हा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये प्रश्न उभा राहिला आहे — “सिद्धार्थ कोणत्या भयानक आणि प्रभावी भूमिकेत दिसणार?”
आपल्या या नव्या अवताराबद्दल सिद्धार्थ म्हणतो,(Punah Shivajiraje Bhosale)
“ही भूमिका माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात वेगळी आहे. पात्रातील क्रौर्य माझ्या चेहऱ्यावर उतरवणं मोठं आव्हान होतं. या लूकचं पूर्ण श्रेय महेश सरांना जातं. त्यांनी माझ्या साध्या फोटोवर काम करून हा प्रचंड प्रभावी लूक तयार केला. पहिल्यांदा हा अवतार पाहिला तेव्हा मी स्वतःच थक्क झालो. मी असाही दिसू शकतो? असा प्रश्न मनात आला. पण महेश सरांवरचा माझा विश्वास इतका दृढ आहे की, मी ही भूमिका मनापासून साकारली आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना माझं हे रूप नक्कीच भावेल.”
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा ऐतिहासिक आशयावर आधारित परंतु आधुनिक संदर्भात रंगवलेला चित्रपट असून त्यात प्रेक्षकांना नव्या पिढीचा ‘शिवाजी स्पिरिट’ अनुभवायला मिळेल, अशी चर्चा सुरू आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहेत, तर सोबत विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, सयाजी शिंदे आणि सिद्धार्थ जाधव यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतील, अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
चित्रपटाची कथा आणि पटकथा स्वतः महेश मांजरेकर यांनी लिहिली असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांचे आहे. निर्माते राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध असून द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला हा भव्यदिव्य चित्रपट झी स्टुडिओज च्या माध्यमातून ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या नवीन पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न — “सिद्धार्थ जाधवचा हा ‘क्रौर्यपूर्ण’ लूक कोणत्या ऐतिहासिक वळणाचं प्रतीक आहे?” उत्तर मिळणार फक्त मोठ्या पडद्यावर!


